धुळे/एरंडोल । महामार्गावरील 500 मिटरच्या आतील मद्यविक्री दुकाने बंद करण्यात आली आहेत. यामुळे मद्यविक्री व बियरबार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. परंतु या मद्य बंदीचा फायदा गावठी, देशी दारू व ताडी विकणार्यांना झाल्याचे चित्र आहे. महामार्गावरील बियर बारमध्ये दररोज सायंकाळी होणारी गर्दी आता गावातील गावठी अड्ड्यावर होत आहे. त्यामुळे गावठी दारूची मागणी अधिक असल्याने पुरवठा अधिक होत आहे.
77 दुकाने वाचली
धुळे जिल्ह्यातील 350 दुकानांपैकी 260 मद्यविक्री दुकाने, बियरबार, बियरशॉपी, देशी दारु दुकाने बंद असून धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा येथील 77 मद्यविक्रीची दुकाने बचावली आहेत. बियर बार व मद्यदुकाने बंद झाल्यामुळे जिल्ह्यात गावठी दारूच्या विक्रेत्यांची चलती आहे. 50 रुपयाची बाटली 80 ते 100 रुपयाला विक्री करून गावठीवाले धुम करत आहेत.
पोलिसांसमोर गावठी दारूचे अड्डे बंद करण्याचे आव्हान
एरंडोल। राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरातील सर्व देशी, विदेशी दारू विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिल्यानंतर परमिटरुम व देशी दारु दुकानांनी विक्री बंद केली आहे. त्यामुळे गावठी दारूच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. गावठी दारू विक्रीवर कोणत्याही वेळेचे बंधन नसल्यामुळे ग्राहकांची गर्दी होत आहे.गावठी दारूच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे गावठी दारूचे अड्डे बंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
बारा लाख बुडाले
तालुक्यातील चौदा परमिटरूम, सहा बिअरशॉपी व पाच देशीदारू विक्रीची दुकाने बंद झाली आहेत. तालुक्यातून दारू विक्रीतून दरवर्षी सुमारे बारा लाख रुपये महसूल शासनाला मिळत होता. ही दुकाने बंद झाल्यामुळे मद्य सेवन करणार्यांनी मोर्चा गावठी दारूकडे वळविला आहे. दारूविक्री बंद होणार असल्याची कल्पना असणार्यांनी विदेशी मद्याचा साठा करून ठेवला शेतात मद्यसेवनाचा आनंद ते घेत आहेत. मद्यविक्रीे बंद झाल्यामुळे सुमारे दोनशे कामगारांसमोर रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. या दुकानांच्या बाहेर शेंगदाणे, फुटाणे, भेळ , अंडे विक्रेत्यांचेही व्यवसाय बंद पडले आहेत. काही ठिकाणी देशी व विदेशी दारूची दराने विक्री करून लुट केली जात आहे.