भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर धोकादायक पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनांवर पोलिसांनी सोमवारी दंडात्मक करवाई केली. येथील नागरिकांनी याचे स्वागत केले. पुणे-सोलापूर महामार्गावर अवजड वाहने बिनदिक्कतपणे उभी केली जात होती. रात्री मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांचा अंदाज इतर वाहनांना येत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढली होती. याची दखल घेऊन भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नीलकंठ राठोड यांनी फौजफाट्यासह महामार्गावर उभ्या असलेल्या या वाहनांवर कारवाई केली. पुणे-सोलापूर महामार्गावरील धोकादायकरीतीने पार्किंग केलेली प्रवासी त्यांनी हटविली. तसेच, वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. पुणे-सोलापूर महामार्गावर धोकादायक स्थितीत प्रवासी वाहने, कंटेनर तसेच अवजड वाहने पार्क केली जात होती. यातूनच गंभीर अपघात घडून निष्पाप नागरिक जिवाला मुकत होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा याच ठिकाणी वाहने पार्क केली जात होती. मुख्य मार्गावरच लावलेल्या या वाहनांमुळे अपघाताची टांगती तलवार कायम होती.