देहूरोड । उड्डाणपुलाच्या कामामुळे आधीच चिंचोळा झालेल्या महामार्गावर आता वाहनचालकांना खड्ड्यांचा सामना करत वाहने चालवावी लागत आहेत. देहूरोड बाजारपेठेजवळ स्वामी विवेकानंद चौकाजवळ भला मोठा खड्डा पडला असून या खड्डयात छोटी वाहने सर्रासपणे घासून आदळू लागली आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा ते रेल्वे उड्डाणपूल या सुमारे पाचशे मीटरच्या अंतरात उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूंनी हलक्या वाहनांना जाण्यासाठी छोटासा रस्ता ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरून मोठ्या वाहनांची वाहतूक पुलाच्या कामाला बाधक ठरण्याची शक्यता असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच निवासी जिल्हाधिकार्यांनी या रस्त्याने अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी केली होती. मात्र, हे आदेश धुडकावून या रस्त्याने सर्रास मोठ्या व अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. परिणामी या परिसरात सततची वाहतूककोंडी निर्माण होत आहे.
अवजड वाहनांमुळे आधीच छोट्या असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. स्वामी विवेकानंद चौकाजवळ पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांतून जाताना लहान व हलकी वाहने जमिनीवर घासली जात आहेत. इंजिनचा भाग घासला जात असल्याने वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले. मोठ्या वाहनांना खड्डयांतून जाताना बसणारे हेलकावे एखाद्या अपघाताला निमंत्रण ठरतील, अशी भीती या भागातील व्यापारी गोविंद राऊत यांनी व्यक्त केली. वाहने खड्ड्यांत आदळून मोठ्या प्रमाणात हेलावतात. अशा स्थितीत शेजारच्या दुकानावर वाहन उलण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे राऊत यांनी सांगितले. संबंधित यंत्रणेला वारंवार सांगूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.