महामार्गावर टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार

0

पोद्दार इंग्लिश मीडीयम स्कूलसमोर अपघात:

जळगाव: पाळधी येथे आपल्या ग्राहकाकडे असलेल्या विवाह सोहळ्यासाठी दुचाकीने जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला टँकरने दिलेल्या धडकेत मागच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महामार्गावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या समोर घडली. महेंद्र गोपालदास आहुजा वय 48, भावना महेंद्र आहुजा वय 48 दोघे रा. गायत्री नगर अशी मयत पती पत्नीची नावे आहेत. अपघातानंतर वाहतूकीचा खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून पसार झाला असून हाती लागलेल्या टँकरच्या क्लिनरचा नागरिकांनी घटनास्थळी चांगलाच चोप दिला.

माता-पित्याच्या मृत्यूने मुले पोरकी

महेंद्र यांना किशोर आहुजा, ब्रिजलाल आहुजा व अशोक आहुजा हे तीन भाऊ तर शांतीदेवी, त्रिष्णादेवी, पुष्पा व सुनिता देवी अशा चार विवाहित बणिही आहेत. महेंद्र हे सर्वात लहान होते. महेंद्र यांना वंशिका (वय 18), प्रिया (वय 12) व ओम (वय 8) अशी तीन मुले आहे. माता व पित्यावर एकाचवेळी अपघाताच्या रुपाने काळाने घातलेल्या झडपमुळे तीनही मुले पोरकी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक मनोज आहुजा यांच्यासह फुले मार्केेटमधील व्यापारी व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग असलेल्या या मार्गाने दाम्पत्याच्या रुपात आणखी दोन बळी घेतल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळाहून पसार झाला. हाती लागलेल्या क्लिनरला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विलास पाटील, गजानन पाटील, चेतन पाटील, उमेश भांडारकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. विलास पाटील, गजानन पाटील या कर्मचार्‍यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यातून दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. तर आधीच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. दुसरीकडे अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एकच मार्ग असल्याने पाळधीपासून तर दुसरीकडे गुजराल पेट्रोलपंपापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ग्राहकाकडे लग्नाला जातांना काळाची झडप

गायत्री नगर परिसरात महेंद्र आहुजा हे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्यास होते. त्यांचे फुले मार्केटमध्ये गोपालदास जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. नेहमीच मालाची खरेदी असलेल्या परिचयाच्या ग्राहकाकडे शनिवारी विवाह सोहळा होता. यासाठी घरुन महेंद्र हे पत्नी भावना सोबत दुचाकीने (एमएच.19-ए.जे.8248) निघाले. दादावाडी येथे विवाह असल्याची त्यांना माहिती होती. ग्राहकाच्या दादावाडी येथील घरी गेल्यानंतर त्यांना विवाह समारंभ पाळधी येथील साईबाबा मंदिरात असल्याचे समजले. यानंतर दाम्पत्य तेथून पाळधीकडे मार्गस्थ झाले. दादावाडीतून निघाल्यावर काहीच अंतरावर महामार्गावर पाळधीकडेच जात असलेल्या टँकरने (एम.एच.04 जी.एफ 0984) आहुजा यांच्या दुचाकीला धडक दिली. यात रस्त्यावर पडून कंटेरनच्या मागच्या चाकात दोघेही सापडले. चेहर्‍याला मार लागल्याने महेंद्र यांच्यासह मागचे चाक डोक्यावरुन गेल्याने पत्नी भावना या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.