जळगाव :दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर दुचाकीवरुन जात असतांना दुचाकीला मागून येणार्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पाळधी बायपासवर घडली. या अपघातात राजाराम भास्कर भालेराव (48, रा. श्रीधर नगर) या पित्यासह विजय राजाराम भालेराव (वय 07) हा मुलगा जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त वाहनधारकांनी पाठलाग करुन काही अंतरावर ट्रकचालकाला पकडले. चोप देत पाळधी दूरक्षेत्र पोलिसांच्या स्वाधीन केले. आठ दिवसात बायपासवर अपघाताची ही दुसरी घटना घडली आहे.
जि.प.सदस्यांनी वाहनातून दोघांना हलविले रुग्णालयात
पाळधी येथे राजाराम भालेराव कपाट बनविण्याच्या फॅक्टरीत वॉचमन म्हणून कामाला असून त याच कंपनी आवारात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी दळण दळण्यासाठी ते दुचाकी क्रमांक एम.एच. 19 बी.व्ही. 8394 ने पाळधीकडून येत होते. दरम्यान मागवून एरंडोलकडून जळगावकडे भरधाव वेगात येत असलेला ट्रक (क्रमांक एम.एच. 41 ए.जी. 3224) ने दुचाकीला धडक दिली. यामुळे तोल जाऊन पितापुत्र खाली पडून गंभीररित्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळयात पडले. ही घटना कळाल्यानंतर जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी येथे तत्काळ धाव घेतली. प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने त्यांनी दोघा जखमींना त्यांच्या वाहनात टाकून जळगावला हलविले. दोघा जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मद्यधुंद ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली असून ट्रक चालक गोकुळ हिरे (45) रा.मालेगाव याला ताब्यात घेतले आहे. विजय या बालकाची कवटी फ्रॅक्चर झाली आहे. तर राजाराम भालेराव यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दोघांचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी बेशुध्दावस्थेत असल्याने ते जबाब नोंदवू शकले नाहीत. दरम्यान ट्रकचालक हा दारुच्या नशेत वाहन चालवित होता, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.