श्री छत्रपती साखर कारखान्याला ऊस वाहून नेणारी वाहने रस्त्यातच केली जातात पार्क
बारामती : पार्किंगची व्यवस्था नसल्याने भवानीनगर येथील श्री छत्रपती साखर कारखान्याला ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर व ट्रक बारामती-इंदापूर महामार्गावरच पार्क केले जात आहेत. या ट्रकने दोन्ही बाजुचा रस्ता पूर्णत: व्यापला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. कारखान्याचे व्यवस्थापक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रणच देणारा ठरत आहे. बारामती-इंदापूर या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा आहेत. या मधूनच एसटी बसेस व खासगी वाहने कसाबसा रस्ता काढत मार्गक्रमण करतात. यामुळे प्रवाशांचा व वाहनचालकांचा प्रचंड वेळ वाया जात आहे.
वाहतुकीला अडथळा
या ट्रकमुळे भवानीनगर बसस्थानक तर दिसेनासेच झाले आहे. या बसस्थानकाच्या आवारात ऊसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर उभे आहेत. यामुळे एसटी बसेस रस्त्यावरच थांबतात. यामुळेही वाहतुकीस अडथळा तयार होत आहे. तसेच प्रवासी व विद्यार्थीही रस्त्यानजीकच छोट्या जागेत उन्हात उभे राहिलेले असतात. बसस्थानकात जाताच येत नसल्यामुळे सर्व प्रवासी रस्त्यालाच उभे असतात. या मार्गावरून पंढरपूर, इंदापूर, वालचंदनगर, अकलूज, सोलापूर, जत, सांगोला, गोंदवले येथे जाणार्या बसेस ये-जा करीत असतात. बारामती, इंदापूरचा रहदारीचा हा महत्त्वाचा राज्यमहामार्ग आहे. मात्र या मार्गावर ऊस वाहतूक करणार्या वाहनांनी कब्जा केल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे.
वाहनचालकांचा बेशिस्तपणा
यातील आणखी धोकादायक बाब म्हणजे, येणार्या जाणार्या वाहनांना ट्रक अगर ट्रॅक्टरच्या आडबाजूने येणारी ऊस वाहतूक करणारी बैलगाडी दिसतच नाही. त्याचप्रमाणे या बैलगाड्यांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्यावेळी तर मोठाच धोका संभवत असतो. कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी सदरची वाहने शिस्तबद्ध् व रिकाम्या जागेत लावल्या तर भरपूर जागा शिल्लक राहील. मात्र, सुरक्षारक्षक येथे दिसूनच येत नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणा आलेला आहे. याबाबत कारखान्याने दक्षता घेण्याची गरज असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली वाहने हटवून योग्य प्रकारे नियमन केले पाहिजे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
प्रवाशांची डोकेदुखी
भवानीनगर येथे विद्यालय व महाविद्यालय असून आसपासच्या गावतील मुले प्रशिक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे बसस्थानकावर सतत गर्दी असते. परंतु या बसस्थानकातच हे ट्रक पार्क केले जात असल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थीही सतत तक्रार करीत असतात.
कारखान्याच्या वाहनतळावर टाकली जातो उसाची मळी आणि भुसा
याबाबत कारखाना व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता, आमच्याकडे सुरक्षारक्षक आहे. त्यांच्याकडे वाहतुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे बेजबाबदारपणाचे उत्तर देण्यात आले. कारखान्याच्या ऊस वाहतूक करणार्या बैलगाड्या, ट्रॅक्टर व ट्रक पार्क करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागाही उपलब्ध आहे. मात्र, या जागेत कारखान्याने मळी आणि भूसा टाकलेला आहे. तर उर्वरीत जागा रिकामी असून वाहने जाण्यासाठी रस्ताच नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे वाहनचालक रस्त्याच्या बाजूलाच वाहने उभी करीत आहे.