महामार्गावर दुचाकीस्वार तरुणांची स्टंटबाजी

0

देहूरोडः वाहतुकीचे नियम जणू काही आपल्यासाठी बनलेलेच नाहीत, आपण काहीही करू शकतो या अविर्भावात तीन दुचाकीवरील दहा तरुणांनी देहूरोडजवळील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अक्षरशः उच्छाद मांडला. जिथे जिथे हे तरुण जात होते होते तिथे तिथे इतर वाहनचालक भयभीत होऊन रस्त्याच्या कडेला आपली वाहने घेऊ लागले. भररस्त्यावर तरुणांच्या स्टंटबाजी आणि हुल्लडपणामुळे काही वेळ नागरिकांना जीव मुठीत घेऊन तेथून निघाले.

शनिवारी ( ता. 5 ) देहूरोडजवळ जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पाहायला मिळाला. महाविद्यालयीन 10 तरुणांचे एक टोळके तीन दुचाक्यांवरून इतर वाहनचालकांना हुलकावणी देत आरडा ओरड करीत निघालेले पाहायला मिळाले. देहूरोडजवळ घोरावडेश्वर डोंगरापासून कात्रज बायपास रस्त्यापर्यंत सकाळी साडेनऊच्या सुमारास तीन दुचाक्यांवर दहा महाविद्यालयीन तरुणांचे एक टोळके डोक्यात उन्माद शिरल्यासारखे आरडा ओरडा करीत निघालेले होते.

दोन दुचाक्यांवर ट्रीपल सीट तर एका दुचाकीवर( एमएच 14 डी वी 9414) चक्क चार जण बसून निघाले होते. त्यापैकी एकजण त्या गाडीवर उभा राहून स्टंट करीत इतर वाहनचालकांना हुलकावण्या देत निघाला होता. त्यांना अन्य वाहनचालकांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे दुर्लक्ष करून ते सर्वजण आणखीनच चेकाळल्यासारखे करू लागले. रस्ता आपल्यासाठीच आहे अशा अविर्भावात ते सर्वजण आरडा ओरड करीत निघाले होते.

अशांवर कडक कारवाई व्हावी
सर्वच नियम आणि कायद्यांची टर उडवत निघाणार्‍या या तरुणांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या उन्मादी तरुणांना स्वतःच्या जिवाची पर्वा नसेलही कदाचित परंतु इतरांचा जीव धोक्यात घालण्याची मुभा यांना कुणी दिली अशी संतप्त प्रतिक्रियाही काही वाहनचालकांनी व्यक्त केली. या तरुणांना शोधून पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा ते या हुल्लडबाजीची पुनरावृत्ती करतच राहतील अशी मागणी इतर वाहनचालकांनी केली आहे.