महामार्गावर पादचार्‍याला धडक देणार्‍या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

ट्रान्सपोर्टनगरजवळील घटना ; पादचारी ट्रक क्लिनरही गंभीर ः मयत सेंट टेरसेंचा स्कूलचा होता विद्यार्थी

जळगाव- मित्राच्या घरुन वह्या व पुस्तके घेवून घराकडे परतांना दुचाकीस्वार विद्यार्थ्यांने पादचार्‍याला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात दुचाकीस्वार संकेत ज्ञानेश्‍वर तायडे वय 16 रा. हनुमान नगर, अयोध्यानगर या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर पादचारी ट्रक क्लिनर गुणवंत दयाभाई दोशी वय 40 रा. गांधीनगर, केसोद, गुजरात हा गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे गुरुवारी सेंट टेरेसा स्कूलला सुट्टी देण्यात आली होती.

मूळ मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील रहिवासी ज्ञानेश्‍वर दयाराम तायडे हे पत्नी वैशाली, मुलगी देवयानी व मुलगा संकेत या कुटुंबांसोबत वास्तव्यास आहे. तायडे यांची एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमध्ये व्ही. 64 सागर इंडस्ट्रीज नावाने इंजिनिअरींग वर्कशॉप आहे. देवयानी लहान असून ती पाचवीला सेंटर टेरेसा स्कूलमध्ये तर संकेत हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

काय घडली घटना
संकेत हा बुधवारी सायंकाळी मित्राच्या घरुन वह्या, पुस्तके घेवून येतो, असे सांगून घराबाहेर पडला. दुचाकी (एम.एच 19 डी.के. 8524) ने मित्राकडे गेला. तेथून अजिंठा चौफुलीकडे महामार्गवरुन येत असतांना ट्रान्सपोर्टनगर येथे महामार्गावरुन पायी जात असलेल्या ट्रक क्लिनर गुणवंत दयाभाई जोशी याला धडक दिली. या दोघेही रस्त्यावर पडले. संकेतला डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी संकेतला मृत घोषित केले. तर गुणवंत जोशी याच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

निघतोय…घरी पोहचतो… मात्र पोहण्यापूर्वी मृत्यू
बराच वेळ झाल्याने कुटुंबियांनी संकेतला फोन केला. त्याने फोनवर कुटुंबियांना निघतो, घरी पोहचतो, असे सांगितले मात्र पोहचण्यापूर्वीच दुर्देवी अपघातात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान बराच वेळ होवूनही संकेत घरी न पोहचल्याने कुटुंबियांनी संकेतच्या मित्राला फोन केला. त्याने संकेत बराच वेळ झाला निघाला असल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबियांनी तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी अपघातग्रस्त दुचाकी दिसली. ती दुचाकी आपलीच असल्याने यानंतर संकेतचा अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर कुटुंबियांनी जिल्हा रुग्ण गाठले. गुरुवारी सकाळी शवविच्छेनानंतर मृतदेह ताब्यात घेवून नेरीनाका येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जेवणाला जातांना ट्रक क्लिनरला दुचाकीची धडक
फिरोजभाई कासमभाई यांच्या मालकीच्या ट्रकवर (जी.जे. 03 व्ही8404) गुणवंत दयाभाई दोशी वय 40 रा. गांधीनगर, केसोद, गुजरात हा ट्रक क्लिनर आहे. बँगलोरहून पाणी असलेले नारळ घेवून ट्रक जळगावला पोहचला. याठिकाणी माल खाली केल्यानंतर चालक ईसाभाई उस्मानभाई ट्रक ट्रान्सपोर्ट नगर येथे लावला. याठिकाणी चालकाने गुणवंत दोशी 100 रुपये दिले व जेवण करुन येण्यास सांगितले. त्यानुसार दोशी जेवणासह महामार्गावरुन पायी असतांना त्याला दुचाकीस्वार संकेतने जोरदार धडक दिली. या अपघातात दोशी गंभीर असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरुन दुचाकीचालक विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.