महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील टि.व्ही. टॉवरजवळ मागून येणार्‍या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत ट्रकने महिलेस चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी 4.25 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीचा चुराडा झाला असून पती जखमी झाला आहे. नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान या अपघातात पुंडलिक सुपडू पाटील हे देखील जखमी झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रकसह चालकांला ताब्यात घेतले असल्याचे समजते.

पत्नी ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने झाला मृत्यू
सुनिता पुंडलिक पाटील वय 48 असे मयत महिलेचे नाव असून भुसावळ येथील नाहाटा कॉलेज मागील एमओएच कॉलनीतील रहिवाशी तसेच रेल्वे कर्मचारी पुंडलिक सुपडू पाटील वय 55 हे पत्नी सुनिता यांच्यासोबत उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात आले होते. उपचार आटोपून ते आपल्या दुचाकी प्लेझर क्रमांक एम.एच. 19 एएस 3667 या गाडीने भुसावळकडे जात असतांना मागून भरधाव येणार्‍या युपी 79 टी 1161 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत पती-पत्नी जमीनावर पडल्याने ट्रकच्या मागच्या चाकात येवून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला.

कुटुंबियांच्या आक्रोश
अपघातात पुंडलिक सुपडू पाटील हे देखील जखमी झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रकसह चालकांला ताब्यात घेतले असल्याचे समजते. दरम्यान आ. राजुमामा भोळे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. घटनेची महिती कळताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कुटुंबियांसह, नातेवाईक रुग्णालयात आक्रोश केला. मयत सुनिता पाटील यांच्या पश्‍चात दिपक व धनराज नामक दोन मुले आहे. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.