पाळधी बायपासवरील जयश्री स्नॅक्सवरील घटना ः
जळगाव: शेतातील केळीचा मालचा वजनकाटा केल्यानंतर पुन्हा शेताकडे परतत असतांना समोरुन येणार्या बसने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास पाळधी बायपास येथे जयश्री स्नॅक्स हॉटेल जवळ घडली. हुकूमचंद केशव पाटील वय 50 रा. खर्डी ता. चोपडा ह.मु. शिव कॉलनी असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की मूळ खर्डी ता. चोपडा येथील रहिवासी हुकूमचंद केशव पाटील हे शिव कॉलनी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. आनंद गिरधारीलाल ओसवाल (रा.जळगाव) यांच्यासोबत शेती व्यवस्थापनाचे करतात. सोमवारी दुपारी हुकूमचंद यांनी विद्यापीठाजवळ असलेल्या ओसवाल यांच्या शेतातून केळीचा माल ट्रकमध्ये भरला. या वाहनाचा वजनकाटा करण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच 19 पीपी 1751) ने पाळधी बायपास येथे गेले. याठिकाणी मालाचा वजन काटा केला व त्यानंतर पुन्हा पाटील हे दुचाकीने शेताकडे परतत होते.
डोक्यात हेल्मेट असतानाही झाला मृत्यू
शेतात परतत असताना पाटील दुचाकी घेवून समोर चालत होते, तर त्यांच्या मागे मालाचा ट्रक येत होता. यादरम्यान जयश्री स्नॅक्सजवळ जळगावकडे येणार्या भरधाव बसने (क्र.एम.एच.18 बी.जी.2733) हुकूमचंद यांना चिरडले. मागून येत माल घेवून येत असलेल्या ट्रकचालकाने ही माहिती आनंद ओसवाल यांना या दिली. त्यानुसार ओसवाल यांच्या नागरिकांनी हुकूमचंद पाटील याना प्रारंभी ऑर्किड हॉस्पिटल तेथून तत्काळ ओम क्रिटीकल येथे हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे हेल्मेट घातलेले असताना देखील डोक्याला मार बसल्याने पाटील यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्यावेळी पाटील यांचा मुलगा राहूल हा देखील याच रस्त्याने शेताकडे दुचाकीने जात होता. त्याला घटनास्थळावरच हे दृष्य दिसले. वडीलांची अवस्था पाहून त्याने एकच हंबरडा फोडला. रुग्णालयातही त्याचा आक्रोश सुरुच होता. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील व इतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठून मदतकार्य केले. हवालदार दिनकर खैरनार यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाळधी पोलिसांना कळविले. पाळधी पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगी हर्षाली, मुलगा राहुल असा परिवार आहे.
जावयाचा वाढदिवस अन् सासरच्या मृत्यू
हुकुमचंद पाटील यांचे जावई मनोहर अशोक पाटील (रा.गुजराल पेट्रोलपंपाजवळ) यांचा सोमवारी वाढदिवस होता. पाटील सायंकाळी वाढदिवसानिमित्त जावयांकडे जाणार होते, तत्पूर्वीच ही घटना घडली. पाटील यांची मुलगी हर्षाली ही देखील गरोदर आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राहूल, मुलगी हर्षाली व दोन भाऊ असा परिवार आहे.