महामार्गावर सिटबेल्ट, हेल्मेट बंधनकारक

0

जळगाव । म हामार्गावर सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. यामध्ये डोक्याला मार लागल्यानेच अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले आहे. या दुचाकीस्वारांना हेल्मेट असते तर ते वाचण्याची शक्यता अधिक होती. मात्र हेल्मेट नसल्याने त्यांचे प्राण वाचले नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने महामार्गावर आजपासून दुचाकी चालविणार्‍यांना हेल्मेट तर चारचाकीधारकांसाठी सिटबेल्ट सक्ती केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गवर सिटबेल्ट व हेल्मेटचा वापर न करता नियमांचे उल्लघंन करणार्‍या वाहनधारकांवर आजपासून कारवाई करण्यात येणार आहे.

सिटबेल्ट, हेल्मेट वापरासाठी शाळा, महाविद्यालयांसह कंपन्यांना दिले पत्र

पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या स्वाक्षरीचे हेल्मेट व सिटबेल्टचा वापर करण्याबाबतचे पत्र महाविद्यालयातील प्राचार्य, कंपन्यांचे व्यवस्थापक यांना शहर वाहतुक शाखेतर्फे देण्यात आले आहे. तसेच आज 17 फेबू्रवारीपासून पासून जिल्ह्यातील सर्व महामार्ग, राज्यमार्गावर हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत तसेच नियम पालन करण्यासाठी जिल्हा पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यात येईल. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या तरूण विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, शिक्षक, कर्मचार्यांनी येताना व जाताना हेल्मेट व सीट बेल्ट सक्ती करण्याकामी शहरातील 50 महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राव्दारे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईसाठी 10 पथक असणार

औद्योगिक संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी यांना कंपनीत येताना व जाताना दूर अंतरावरून यावे लागते. त्यांच्या सुरक्षेची सदर कंपनी, संचालक,मालकाची प्राथमिक जबाबदारी असून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आवाहन करण्यात आले आहे. सुमारे 250 कंपनी,मालक, संचालकांना हेल्मेट सक्तीचे पत्र देण्यात आले आहे. दरम्यान, हेल्मेट व सिटबेल्न न लावणार्‍या वाहनधारकांवर कारवाईसाठी 10 पथक असणार असून यात 5 जिल्हा वाहतुक तर 5 शहर वाहतुक शाखेचे पथक असणार आहे.