महामार्गावर स्वतंत्र वाहतूक विभाग

0

पोलीस अधिक्षकांचा निर्णय : गणेशोत्सवापूर्वी होणार कार्यान्वित

पुणे : पुणे जिल्ह्यातील महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे नवीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महामार्गावरील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वंतत्र वाहतूक विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवापूर्वी हे वाहतूक विभाग सुरू होतील, असे पाटील यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातून पाच महामार्ग जातात. या मार्गावर सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यासाठी महार्गावरील पोलिस ठाण्यात स्वंतत्र वाहतूक विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागात एक अधिकारी पाच कर्मचारी, 25 वॉर्डन आणि दहा होमगार्ड राहणार आहेत. खेड-चाकण या पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक अधिकारी व दहा कर्मचार्‍यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्यांना खासगी क्षेत्रातील ट्रॅफिक वॉर्डन मदत करतील. या मार्गावर शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाहतूककोंडी होती. त्याबाबत हे पथक खबरदारी घेईल. बारामती शहरासाठी वेगळा वाहतूक विभाग तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी एक अधिकारी व 15 कर्मचारी देण्यात आले आहेत. महामार्गावरील अवजड वाहनांच्या वेळा नियंत्रित करण्यात येणार आहेत. विशिष्ट वेळातच अवजड वाहनांची वाहतूक सुरू ठेवली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.