महामार्ग चौपदरीकरणात रॉयल्टी न भरताच मुरूमाची वाहतूक

0

मुक्ताईनगर- गुजरातमधील कच्छच्या सरस्वती कंन्ट्रक्शन कंपनीमार्फत बोदवड ते ईच्छापूर चौपदरीकरणाचे काम सुरू असून कामासाठी लागणारा मुरूम ग्रुपग्रामपंचायत पिंप्रीपंचम येथील गट क्र.85 धाबे शिवार येथून शासकीय गौण खनिज रॉयल्टी भरणा करण्याच्या अटीवर वाहतूक करण्याचा नाहरकत दाखला ग्रामपंचायतीने दिला होता. संबंधित कंपनीने कोणत्याही प्रकारचा रॉयल्टी भरणा न करता साधारणतः 30 हजार ते 35 हजार ब्रास गौणखनिजाची वाहतूक केली आहे. या कंपनीने ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केल्यानंतर संबंधितांवर कार्यवाही करावी तसेच गौणखनिज रॉयल्टी वसुल करावी, अशी मागणी मुक्ताईनगर तहसीलदारांना पिंप्रीपंचम येथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. प्रसंगी रामदास चौधरी, गोपाळ कोळी, अतुल महाजन, मिलिंद पानपाटील, मनोहर वायकोळे, गजू पाटील, निलेश महाजन व योगेश आदी उपस्थित होते.