महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे राष्ट्रवादीची निवेदनाद्वारे तक्रार
देहूरोड : निगडी ते देहूरोड दरम्यानच्या सुमारे सव्वासहा किलोमीटर परिसरातील जुन्या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कामाचा सुरुवातीच्या तीन महिन्यातील वेग चांगला होता. मात्र, मागील काही महिन्यांत या कामात दिरंगाई सुरू आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे केली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अनेक ठिकाणी चर खोदण्यात आले आहेत. कामाचे साहित्यदेखील रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होणे, अनेक लहान-मोठे अपघात होणे, अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांकडून होत आहे.
जानेवारी कामाला प्रारंभ
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील निगडी ते देहूरोड दरम्यानच्या 6.3 किलोमीटर अंतरातील चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास मंडळाने हाती घेतले आहे. जानेवारी महिन्यात हे काम सुरू झाले. सुरुवातीच्या तीन महिन्यात कामाला चांगला वेग होता. मात्र, सध्या हे काम संथगतीने सुरू आहे. या संदर्भात राष्ट्रवादीने रस्ते विकास मंडळाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
अपघाताचा धोका
चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या भागातील पथदिवे काढण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. सायकल किंवा दुचाकीने प्रवास करणार्या प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. तसेच या भागात रस्त्याला लागूनच चर खोदून ठेवला आहे. त्यावर रिफ्लेक्टर किंवा अन्य सुरक्षेच्या उपाययोजना नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. नुकताच या चरामुळे एक अवजड कंटेनर उलटला होता.
रस्त्यावर पसरली खडी
सवाना हॉटेलजवळ विकासनगरकडे जाणार्या रस्त्यावर खडी पसरण्यात आली आहे. या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार होत आहेत. सवाना चौक आणि स्वामी विवेकानंद चौक या दोन प्रमुख चौकांमध्ये या कामामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी अॅड. कृष्णा दाभोळे, मिकी कोचर, यदुनाथ डाखोरे, रेणू रेड्डी, बाळासाहेब जाधव, गणेश कोळी आदींनी केली आहे.