महामार्ग परिसरात विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

0

यावल । येथील इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूल ही बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावर असून या शाळेसमोर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. त्यामुळे शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
भरधाव वेगाने चालणार्‍या वाहनांमुळे अपघात होवून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून शाळेत ये-जा करावी लागते. याच परिसरात काही दिवसांपुर्वी दोन विद्यार्थीनींचे अपघात घडले आहे.

वाहनधारक शाळा परिसराचा विचार न करता भरधाव वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे अचानक वाहनासमोर विद्यार्थी आल्यास अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे याठिकाणी शहर वाहतूक शाखेतर्फे कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येवून वाहनधारकांना शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. तसेच वेगवान वाहनांच्या गतीला आळा घालण्यासाठी परिसरात गतिरोधक बसविण्यात येण्याची गरज आहे. यासंदर्भात इंदिरा गांधी उर्दू हायस्कुलतर्फे जिल्हाधिकार्‍यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसिलदार, यावल पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.