महामार्ग समांतर रस्त्यांच्या मागणीवर जळगावकरांचे एकमत

0

जळगाव । प्रशासनाच्या ठिम्म कारभारामुळे शेकडो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. शेकडो नागरिकांच्या जीवावर उठलेल्या आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या जळगाव शहरामधुन जाणार्‍या राष्ट्रीय महार्गा क्रमांक 6 चे विस्तारीकरण व्हावे यासाठी अनेक दिवसांपासुन अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलन, उपोषणे, मोर्चे काढली परंतु काहीही साध्य झाले नाही. प्रशासनाच्या ठिस्साळ कारभारामुळे आजपर्यत शेकडो नागरिकांना महामार्गावर जीव गमवावे लागल्याने याविरोधात एकत्र येऊन सकारात्मक चळवळ उभी करण्याची गरज असल्याने शहरातील 70 हुन अधिक संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी ‘एक नागरिक’ मंचाची स्थापना केली.

लोकप्रतिनिंधीच्या दारासमोर जावुन उपोषण
या एक नागरिक मंचाची सभा शहरातील जयप्रकाश नारायण चौकात पार पडली. या सभेत अनेक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त केले. सभेच्या माध्यमातुन संपुर्ण जळगाववासीय समांतर रस्त्याच्या मागणीसाठी आग्रही असल्याचे दिसुन आले. महानगर पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून समांतर रस्ताचा मुद्दा सुटु शकतो मात्र हे दोन्ही एकमेकांच्या आड लपतात त्यामुळे हा प्रश्‍न सुटत नाही. त्यामुळे याविरोधात प्रत्येक लोकप्रतिनिंधीच्या दारासमोर जावुन उपोषण करण्यात येणार आहे.

यावेळी महामार्ग अपघातात मयतांच्या नातेवाईकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. स्वाती अहिरराव, शंभु पाटील, डी.डी.बच्छाव, अश्‍विनी देशमुख, सचिन पाटील, प्रताप जाधव यांनी मत व्यक्त केले. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, राधेश्याम चौधरी, बंटी जोशी, यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यासभेचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी यांनी केले.