पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गिकेच्या कामाचे भूमिपूजन निश्चित झाले आहे आणि कर्वेनगर-कोथरूडमधील मेट्रो मार्गिकांच्या कामांनी गती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य भागातील महामेट्रोच्या भूमिगत मार्गिकेचे कामही आता सुरू होणार आहे. शेतकी महाविद्यालय ते फडके हौद या 5.19 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाची निविदा महामेट्रोकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भूमिगत मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार होईल.
आराखडा महामेट्रोला सादर
टाटा आणि गुलेरमार्क या दोन्ही कंपन्यांकडून भूमिगत मेट्रो मार्गिकेचा विस्तृत आराखडा महामेट्रोला सादर करण्यात आला आहे. या कामामध्ये टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पायरिंग रिंग, ओव्हर हेड क्रेन, लोकोमोटिव्ह अशी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येणार आहे. कंपनीकडून कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार असून बोगद्याचा आकार सर्वत्र एकसारखा ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकार्यांकडून देण्यात आली.
काम दोन टप्प्यात
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरू करण्यात आली आहेत. यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेअंतर्गत शेतकी महाविद्यालय ते फडके हौद या 5.19 किलोमीटर लांबीचा मार्ग हा भूमिगत असणार आहे. भूमिगत मेट्रोचे हे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मागविण्यात आली होती. या निविदेला मान्यता देण्यात आली असून टाटा आणि गुलेरमार्क या कंपन्यांना संयुक्तपणे हे काम देण्यात आले आहे.
टनेल बोअरिंग मशीनद्वारे बोगद्यांची निर्मिती
भूमिगत मेट्रोसाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. नव्या अद्यावत तंत्रज्ञानानुसार टनेल बोअरिंग मशीनद्वारे (टीबीएम) बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे. ही यंत्रणा जमिनीखाली उतरविण्यासाठी मोठा खड्डा (शाफ्ट) तयार करण्यात येणार असून सध्या शाफ्ट तयार करण्याचे काम महामेट्रोकडून सुरू आहे. त्यामुळे भूमिगत मेट्रोच्या कामालाही गती मिळणार आहे.
पहिला टप्पा अडीच किलोमीटरचा
शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गिकेसाठी दोन टप्प्यात निविदा प्रक्रिया मागविण्यात आल्या होत्या. शिवाजीनगर (शेतकी महाविद्यालय) ते बुधवार पेठ (फडके हौद चौक) स्थानकापर्यंतचा पहिला टप्पा हा अडीच किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये शिवाजीनगर ते धान्य गोदाम या दोन भुयारी स्थानकांचा समावेश आहे. फडके हौद ते स्वारगेट पर्यंतच्या भूमिगत मार्गिकेसाठी स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या आहेत.