पुणे । वनाझ ते रामवाडी या मेट्रोच्या दुसर्या मार्गिकेबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महामेट्रोचे सहयोगकेंद्र मंगळवारपासून सुरू होणार आहे. महामेट्रोतर्फे चालवण्यात येणार्या या केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना मेट्रोबाबत पडणार्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी याचा चांगला उपयोग होताना दिसत आहे. शहरातील मेट्रोचे काम कसे चालू आहे, कुठपर्यंत बांधकाम झाले आहे, नदीपात्रातील कामाचा आढावा, वाहतूक व्यवस्थेत करण्यात येणारे बदल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे केंद्र खुले असणार आहे. नागरिकांच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी महामेट्रोचे चार प्रतिनिधी या केंद्रात सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशा दोन भागात कार्यरत असतील.
मेट्रोची माहिती पुस्तिका उपलब्ध
चार प्रतिनिधींपैकी एक पर्यवेक्षक असेल आणि तीन कर्मचारी असणार आहेत जे नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. या सहयोग केंद्रात मेट्रोची माहिती पुस्तिका उपलब्ध असून, मेट्रोचे मार्ग, स्थानके, मेट्रोमुळे नागरिकांना होणारे फायदे आदींची माहिती त्यात उपलब्ध आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी महामेट्रोतर्फे राबविण्यात येत असलेले हरीत उपक्रम, अपघातात होणारी घट, प्रदूषणाचे कमी होणारे परिणाम, स्थानिकांना मिळणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार, प्रवासाचा कमी होणारा वेग अशा प्रकारची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. महामेट्रोतर्फे बनवण्यात आलेले मेट्रोच्या संदर्भातील व्हिडिओ ही पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.