‘महामेट्रो’ला आचारसंहिता भंगाची नोटीस?

0

विस्तारीकरणाची माहिती दिल्याने अडचणीत

पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना, मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दिल्यामुळे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित अडचणीत आले आहेत. जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी तक्रारीची चौकशी करून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दीक्षित यांना आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.

मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दीक्षित यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेने स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गासाठी खर्च करण्याची तयारी दर्शविली. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) तातडीने अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहितीही दीक्षित यांनी दिली. वनाझ ते रामवाडी दरम्यानचा मेट्रो मार्ग चांदणी चौकापर्यंत करण्यासाठी पालिकेने महामेट्रोला पत्र पाठविले असून, या मार्गाचा अहवाल सहा महिन्यांत पूर्ण होईल, असेही सांगितले. याबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. या विषयी जिल्हाधिकारी म्हणाले, मेट्रोकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याची तक्रार आली आहे. मात्र, नोटीस बजाविण्यापूर्वी चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.