पुणे । महामेट्रोकडून वनाज ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावर शीघ्रकृती दल (क्युआरटी) तैनात करण्यात येणार आहे. यासंबधीची माहिती मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिर्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महामेट्रोने मार्गिका क्र. 1 मधील वनाज ते शिवाजीनगर या मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीला वनाज परिसरात रस्त्यावर मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रोचे एक शिघ्रकृती दल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकात तीन अधिकारी असणार आहेत. या पथकाला एक वाहन आणि चालक देण्यात येणार असून त्या वाहनात प्राथमिक उपचारांचे साहित्य असणार आहे. याशिवाय मेट्रो मार्गावरील रुग्णालये महामेट्रोकडून संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गावर काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघातांची घटना घडल्यास या दलाकडून संबधितांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही बिर्हाडे यांनी सांगितले. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी व अन्य आपत्कालीन परिस्थितीत या पथकाडून मदत पुरविली जाणार आहे. येत्या बुधवारपासून हे पथक कार्यरत होणार आहे.