महामेट्रो करणार 302 झाडांचे पुनर्रोपण

0

हॅरीस ब्रिज ते पिंपरीपर्यंतच्या 65 झाडांची तोडणी, 119 झाडांची छाटणी

पिंपरी-चिंचवड : शहरातील हॅरीस ब्रिज ते पिंपरी महापालिकापर्यंतची 367 झाडे मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. त्यासाठी 65 झाडे तोडावी लागणार आहेत. तसेच, 119 झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. त्याच्या बदल्यात महामेट्रो प्रशासनाकडून 302 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांनी दिली.

सात किलोमीटरच्या टप्प्याचे काम सुरू
महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनतर्फे स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड हद्दीतील हॅरीस ब्रिज ते पिंपरी महापालिका अशा सात किलोमीटरचा पहिल्या टप्प्यात काम सुरू आहे. त्यामध्ये सहा मेट्रो स्थानके येणार आहेत. हॅरीस ब्रिज ते निगडीपर्यंत महामार्गाच्या बाजूला अंदाजे चार हजार 400 झाडे आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने या महामार्गाच्या दुभाजकावर अनेक वर्षांपासून जोपासलेली झाडे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गाला अडथळा ठरत आहेत. त्यामध्ये पिंपळ, उंबर, चंदन, कडुनिंब, खाया व मोहगणी या देशी वृक्षांचाही समावेश आहे.

तोडणी-छाटणीसाठी परवानगी
हॅरीस ब्रिज ते पिंपरी महापालिकापर्यंत 367 झाडे मेट्रोने बाधित होत आहेत. त्यापैकी 65 झाडे तोडावी लागणार आहेत. तर, 119 झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. ही झाडे तोडायला आणि छाटणी करायला महापालिकेने महामेट्रोला 24 जुलै 2017 रोजी परवानगी दिली आहे. त्याच्या बदल्यात महामेट्रो महापालिकेच्या उद्यानात 302 झाडांचे पुनर्रोपण करून देणार आहे.