मुंबई: महाराष्ट्र नव निर्माण सेनेतर्फे आज महामोर्चाआचे आयोजन आले आहे. हा मोर्चा भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना हाकला या मागणीसाठी आयोजित केला आहे. या मोर्चासाठी राज्यातून हजारोंच्या संख्येने मनसे सैनिक मुंबईत दाखल होत आहे. मनसे मोर्चासाठी येणाऱ्या पक्षाच्या गाड्या टोलनाक्यांवर मोफत सोडण्यात येत आहे.
याबाबत मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून कल्पना दिली होती. या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, मनसेच्या महामोर्चासाठी पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे टोल नाक्यावर कोणताही वाद विवाद होऊ नये म्हणून या मार्गावरील टोलनाक्यावर मनसेच्या वाहनाकडून टोल वसूल करु नये, अशा सूचना संबंधित व्यवस्थापनाला देण्यात याव्यात अशी मागणी केली होती.
दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.