मुंबई: मुंबईत आज महाराष्ट्र नव निर्माण सेनेने महामोर्चाचे आयोजन केले आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (एनआरसी) यावरून देशभरात प्रचंड वादंग सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरे दार येथील सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेवून महामोर्चासाठी रवाना झाले आहे.
मनसेचा घुसखोरांविरूद्धचा मोर्चा भाजपा पुरस्कृत असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली होती. त्याला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं. “तेरा वर्ष आमचा पक्ष भाजपानं पोसलेला नाही. आमच्या मोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अशा पद्धतीनं टीका केली जात आहे. पण, त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आम्ही मोर्चातून उत्तर देऊ,” असं नांदगावकर म्हणाले.
मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या महामोर्चाच्या एक दिवस अगोदरच माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली. तर शिवसेनेतील सुहास दशरथे, नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश कौदगे यांनीही मनसेत प्रवेश केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्ष कार्यकर्ते रविवारी सकाळी मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथे एकत्र जमून आझाद मैदानात जाणार आहेत. आझाद मैदान येथे राज यांची जाहीर सभा होणार आहे. या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनीही तयारी केली आहे. पदयात्रा, सभा यावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.