विरोधक जोरदार आक्रमक झाल्यावर शिवसेनेचे सदस्य देखील अतुल भातखळकर यांनी हात जोडून माफी मागावी अशी मागणी करत आक्रमक झाले. शिवसेना आमदार संजय सिरसाट यांनी भातकाळकर यांनी आलतू फालतू विषय आहे असं म्हटलंय हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी माफी मागावी, असे म्हटले तर अनिल कदम यांनी सदनाची माफी हात जोडून मागावी अशी मागणी केली. यावर भाजपचे योगेश सागर यांच्यासह अन्य काही सदस्य भातकाळकर यांनी माफी मागितलीय असे म्हणत समर्थनार्थ उतरले. यावर चांगलीच बाचाबाची झाल्याने सेना-भाजप सदस्य अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, महादेव जानकर, विनोद तावडे, दिवाकर रावते, रवींद्र वायकर यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर अतुल भातकळकर यांनी सदनाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली. यानंतरही विरोधकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. मात्र शेवटी अध्यक्षांकडे बैठक होऊन अध्यक्षांनी भातकळकर यांना सभागृहात कडक भाषेत समज देऊन या प्रकरणावर पडदा टाकला.
भाजप आमदार अतुल भातकळकर यांच्या वादग्रस्त विधानाने शिवसेना, विरोधी पक्षाच्या सदस्यांचा संताप
सदस्यांनी राजदंड पळवला, माफी मागून समज दिल्यानंतर निवळले वातावरण
निलेश झालटे,नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याच्या उंचीवरून विधानसभेत जोरदार हंगामा झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुतळ्याची उंची कमी केली असून तलवारीची उंची वाढविली असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर हरकत घेताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेसह विरोधक संतप्त झाले. यावरून सेना-भाजपचे सदस्य अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र विधानसभेत दिसून आले. याच मुद्द्यावरून तीन वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर शेवटी अतुल भातकळकर यांनी सदनाची आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितल्यानंतर वाद निवळला. याउपरही विरोधकांनी त्यांच्या किमान एका दिवसाच्या निलंबनाची मागणी केली, शेवटी अध्यक्षांनी भातकळकर यांना समज दिल्यानंतर या वादाच्या विषयाला पूर्णविराम मिळाला. या गोंधळात माजी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेल्या मूळ विषयाला मात्र बगल मिळाली.
-वादग्रस्त भातखळकरांचा माफीनामा
हे देखील वाचा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २५ फुटांनी कमी करून केवळ तलवारीची उंची वाढविली असल्याचा आरोप केला. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीचा आधार घेत चव्हाण यांनी मूळ आराखड्यात बदल केला असा आरोप केला. विरोधक या विषयावर आक्रमक होत असतानाच सदस्य अतुल भातखळकर यांनी हरकत घेत, ‘सभागृहाचे कामकाज सुरु असताना अशा भलत्या-सलत्या विषयांना समोर आणताहेत’ अशा आशयाचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षासह शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले. विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरु केली. यावेळी भातकळकर यांनी, मी भलता हा शब्द पृथ्वीराव चव्हाण यांच्याविषयी वापरला असल्याचे सांगत महाराजांबद्दल मी काहीही बोललो नसल्याचे सांगितले. शेवटी त्यांनी या वक्तव्याबद्दल सदनाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली.
-भाजप-शिवसेनेचे सदस्य एकमेकांच्या अंगावर
गुलाबरावांचा विरोधी पक्षनेत्यांवर पलटवार
विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी अतुल भातखळकर यांचे हे विचार निषेधार्ह आहेत. ही मनुवादी विचारी माणसे असून त्यांचे निलंबन करा अशी मागणी केली. यावर मंत्री मुनगंटीवार यांनी हरकत घेत पवार यांनी मनुवादी विचाराचे हे लोक आहेत हे विधान रेकॉर्डवरून काढा अशी मागणी केली. अशा पद्धतीच भाष्य करणे हेदुसऱ्याच्या सन्माला ठेस पोहोचणारी आहे. इथं कुणीच मनुवादी विचारला प्रोत्साहन देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या जनतेची सरकारने दिशाभूल केलीय. भातकळकर यांनी महाराजांचा अवमान केलाय. ज्या छत्रपतीचे नाव घेत शिवसेना सत्तेत आली ती आता मूग गिळून बसलीय, असा आरोप केला. यावर राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज सेनेला सांगण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्याशिवाय कधीच कामकाज केलं नाही, आजही आम्ही करत नाहीत. तुम्ही काय केलं ते सांगा? असा पलटवार केला.
विरोधकांच्या पोटात दुखतंय: मुख्यमंत्री
दरम्यान या गोंधळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयी बोलताना विरोधकांवर जोरदार टीकास्त्र केले. मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे करण्यात येणाऱ्या स्मारकात जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल. पुतळ्याची उंची कमी केली नाही. हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेल तेवढा राज्य शासन देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पहिल्यांदा केवळ संकल्प चित्र पाठविण्यात आले होते तो प्रस्ताव नव्हता. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळ्याचे डिजाईन करताना समुद्रातील वारे, लाटा यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. समुद्रात हवेचा दाब सहन करून पुतळा असावा अशा पद्धतीने त्याचा आराखडा केला आहे. पुतळ्याची उंची कमी केली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कुठेही कमी करण्यात आली नाही. इतके वर्ष यांना काही जमलं नाही आणि आम्ही सगळ्या परवानग्या आणल्या म्हणून यांच्या पोटात दुखत आहे. वारंवार काही छोट्या तांत्रिक चुका काढून छत्रपतींचा अपमान केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.