महाराणी पद्मिनीदेवीची कथा। जोहरची गाथा॥

0

महाराणी पद्मिनीदेवी यांचा जोहर
नराधम सैतान अल्लाउद्दीन खिलजीच्या जुलमाचे तुकडे करून टाकण्याची 15 सहस्र मानधन कुलांगणा त्या वीरांगणा अग्नीनारायणाला स्वप्राणांची आहुती देऊन प्रसन्न करून घ्यायला उतावीळ झाल्या होत्या. मंगल, चिन्मय जोहरव्रतानंतरच रणचंडीच्या रणमहायज्ञाची पूर्णाहुती होणार होती. उरलेसुरले राजपूतवीर रणयज्ञात प्राणांचा होम करून याच रणयागाची सांगता करणार होते. राजपूतवीरांनी कुलस्त्रियांच्या जोहरव्रताचा श्रीगणेशा केला.चित्तोडची अखेरची आपोष्णी! भव्य राजमंदिराच्या तळाखाली प्रचंड विस्तीर्ण भुयारात पुण्यपावन तेजस्विनींच्या सतीत्व रक्षणाकरिता राजपूत वीरवरांनी चिता रचली. लांबरुंद भुयारात शालवृक्ष आणि चंदन यांची खंडोगणती लाकडे रचली. सतीत्वाचे रक्षण करण्यासाठी निष्कलंक, धीरोदात्त वीरांगणांच्या महायात्रेची पूर्वसिद्धता झाली होती.

26.8.1303 हा चित्तोडच्या पावन, रोमांचकारक इतिहासातला चिरस्मरणीय परम मंगल दिवस उगवला. दिशा उजळायच्या आतच सर्वच्या सर्व राजपूतवीरांगणांनी स्नाने उरकली. महाराणी पद्मिनीदेवीनेही ब्राह्ममुहूर्तावर स्नान केले. नित्य नैमित्तिक धर्मविधी उरकले. कुलदेवता भगवती दुर्गादेवी आणि भगवान एकलिंगजी यांचे पूजन केले. सवत्स धेनुपूजन केले. गजराजाची पूजा केली. राजपुरोहितांना हिरे, माणके, रत्ने आणि सुवर्ण यांची दाने दिली. त्यांचा आशीर्वाद घेतला. परम मंगल सुवासिनींची वस्त्रे धारण केली. बहुमोल अलंकार घातले. धीरोदात्त, महाराणी पद्मिनीदेवी मंगल कलश घेऊन निघाली.

महाराणी पद्मिनीदेवीपाठोपाठ पंधरा सहस्र कुलस्त्रिया मंगल कलश घेऊन निघाल्या. पावन, विस्तीर्ण अग्नीकुहरात राणी पद्मिनीदेवीने पाऊल ठेवले. रचलेल्या भव्य चित्तेतच मध्यभागी महाराणी पद्मिनीदेवी बसली. सभोवती सर्वच्या सर्व कुलस्त्रिया बसून त्या परम मंगल जोहारगीते आळवू लागल्या. त्या मंत्रमुग्ध करणार्‍या धीरगंभीर वाणीने राजपूतवीरांच्या चित्तवृत्ती थरथरल्या. काही क्षणांतच चिता धडाडली. अग्नीज्वाला उंच उफाळल्या. लवलवणार्‍या अग्नीज्वालांकडे राजपूतवीर एकटक पाहत निश्‍चल उभे होते. त्यांच्या नेत्रांत अश्रू नव्हते. सूडाची धगधगती प्रखर अग्नीस्फुल्लींगे त्यातून बाहेर पडत होती. त्या मृत्यूला भ्यायल्या नाहीत, तर मृत्यूच त्यांना भ्यायला होता. जळणार्‍या, फुटणार्‍या लाकडांव्यतिरिक्त कसलाही आवाज येत नव्हता. ज्या विस्तीर्ण प्रशस्त मुखातून रसरसणार्‍या लाव्हारसाचे कल्लोळावर कल्लोळ उठत होते, तो ज्वालामुखी शांत झाला होता; पण राजपूतवीरवरांच्या अंतःकरणातला धुमसणारा ज्वालामुखी मात्र विलक्षण उफाळत होता. रक्तपिपासू, भोग हेच दैवत असलेल्या नरराक्षसा, तुला सुरसुंदरी, सौंदर्यवती पद्मिनी हवी ना! नरपिशाच्चा, सतीत्वाचे ज्वलज्जहाल प्रतीक असलेल्या, गंगाजलासारख्या पावन, निष्कलंक पद्मिनीदेवीने मानव समाजाच्या सहृदयतेला शोकाचे पाझर फोडीत केव्हाच स्वर्गाची वाट सुधारली. नरकाची उपासना करणार्‍या बेशरम सैताना, पुण्यपावन पद्मिनीदेवीच्या राखेलाही तुझा विटाळ व्हायचा नाही.

जयहर कुहर म्हणजे धगधगता ज्वालामुखीच
आजही त्या ज्वालामुखीतून भीषण झंझावाताचे लोट बाहेर पडतात. जोहराच्या परम पवित्र दिवसापासून तो आजतागायत त्या पुण्यपावन जयहर कुहरात कुणालाही जाता आले नाही. कुणाचाही विटाळ त्या अकलंकित शूची तीर्थाला खपत नाही. डोळ्यात बोट घातले, तरी दिसणार नाही, अशा घनदाट काळोख असलेल्या जयहर कुहरात दिवा घेऊन जायला धजाल, तर यज्ञवेदींचे संरक्षण करणारे आतील अजस्त्र नाग प्रचंड फुत्काराने क्षणार्धात दिवा विझवून टाकतील. रजपूत इतिहासावर प्रचंड लेखन करणारा ग्रंथकार कर्नल रॉड अद्ययावत सामग्री घेऊन जयहर विहारात जायला सिद्ध झाला; परंतु जालीम नागांच्या विषारी फुत्कारांनी आणि भीषण प्राणघातक वायूने त्याचा थरकाप उडाला. कर्नल रॉड परत त्या कुहराच्या वाटेला गेलाच नाही.

पावित्र्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेली जयहर यज्ञवेदी
जोहराचा पुण्यपावन मंगल दिवस हा राजपुतांचा धर्मसण आहे. केवळ स्मरणानेही लोकांना पवित्र करायला समर्थ असलेल्या जयहर कुहराच्या दर्शनाला स्वर्गातून प्रत्यक्ष देवही उतरतात, अशी रजपुतांची अविचल श्रद्धा असल्यास नवल काय? राजस्थानात जोहराची, सतीत्वाची, मृत्यूला कस्पट लेखणार्‍या गृहिणींची हवा वाहते आहे. त्या हवेत आजच्या अत्याधुनिक स्त्रियांनी जरा श्‍वास घ्यावा. ती हवा हृदयात शिरू द्यावी, भारत की नारी है ! फूल नहीं चिंगारी है। या चिंगारीतच स्वरक्षणाचे सामर्थ्य आहे. या हवेमध्ये भोगप्रवण अत्याधुनिक स्त्रीला अंतर्मुख बनवण्याची क्षमता आजही आहे. गढ तो चित्तोडगढ और सब गढैया! धन्य तो चित्तोड आणि धन्य ती सतीव्रता महाराणी पद्मिनी॥ हे महाराणी पद्मिनीदेवी, तुला त्रिवार प्रणाम!

– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387