मुंबई: कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गोळ्या घाला असे वादग्रस्त विधान केले होती. या वक्तव्यावरून सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण पसरले आहे. या भागातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यावर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांची गाठ शिवसेनेशी आहे. महाराष्ट्रात देखील कन्नड लोक राहतात हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे असा इशारा दिला आहे.
कन्नड वेदिका संघटना आहे की वेडीका संघटना….ती वेड्यांचीच संघटना आहे. महाराष्ट्राला नेहमी आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागला आहे. बेळगाव, कारवार निपाणीमधील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत आहे. मराठी माणसावर पराकोटीचा अन्याय कर्नाटक सरकारने केला आहे. पण महाराष्ट्राने प्रतिक्रिया कधीही दिली नाही असे अरविंद सावंत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा काल संध्याकाळी जाळण्यात आला. त्याची प्रतिक्रिया लगोलग कोल्हापूर येथे उमटली. युवासेनेने जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे आणि सहकाऱ्यांनी काल रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारो आंदोलन केले. परिणामी,वातावरण तापू लागल्याने दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने दक्षतेचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद केली आहे.