महाराष्ट्राकडून केरळला आणखी ५ टन अन्न

0

मुंबई: केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या दिवशी आणखी ३० टन अन्न पाठवले आहे. याशिवाय आणखी पाच टन मदत आज, सोमवारी देण्यात होणार आहे. शनिवारी सुमारे साडेसहा टन मदत पाठवण्यात आली होती. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्यात आली आहे. केरळ सरकारने मागितलेल्या अत्यावश्यक गोष्टी प्राधान्याने पाठवण्यात येत आहेत. जसे, अन्नाची पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा या आधीच केली आहे. राज्य सरकार सातत्याने केरळ सरकारमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मदतीव्यतिरिक्त एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेलफेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यांसारख्या संस्था, संघटना या कामात सक्रिय योगदान देत आहेत. राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांनी गोळा केलेली ४० टन सामग्रीही पाठवण्यात आली आहे.