महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत

0

हैदराबाद । पुरुषांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकाचे कडवे आव्हान चुरशीच्या लढतीत 35-34असे मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली.सन2007साली अमरावती – विदर्भ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र दिल्लीचा पाडाव करीत विजेता ठरला होता. दहावर्षांनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा विजेतेपदाची संधी प्राप्त झाली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने सुरुवात आक्रमक केली. त्यामुळे पूर्वार्धात महाराष्ट्राकडे 22-11अशी भक्कम आघाडी आली.उत्तरार्धात या मोठ्या आघाडीमुळे त्यांची सामन्यावरील पकड ढिली झाली. याचा फायदा उठवित कर्नाटकने लोणाची परतफेड करीत आघाडी कमी केली. यानंतर आणखी आक्रमणाची धार वाढवित 34-32अशी कर्नाटकाने आघाडी देखील घेतली. यावेळी महाराष्ट्राचे गिरीश इरनाक, नितीन मदने व सुपर कॅच किंग ऋतुराज कोरवी मैदानात शिल्लक होते व शेवटची दोन मिनिटे शिल्लक होती. अशा वेळी गिरीशने अव्वल पकड करीत महाराष्ट्राला 34-34अशी बरोबरी साधून दिली. त्याचबरोबर रिशांकला जीवदान दिले. काही चढाया अशाच गेल्या. महाराष्ट्राची पहिली तिसरी चढाई पडणार होती म्हणून कर्नाटकने देखील काही हालचाल केली नाही. ही सामन्याची शेवटची आणि तिसरी चढाई कप्तान रिशांकने केली.

भारतीय रेल्वेची 32 वर्षांची विजयी परंपरा खंडित
हिमाचल प्रदेशने भारतीय रेल्वेची 32 वर्षाची विजयी परंपरा खंडित करीत 65व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाचे अजिंक्यपद पटकाविले. गोचिबोवली-हैद्राबाद येथील जी एम सी बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात हिमाचलने रेल्वेचा प्रतिकार 38-25 असा मोडून काढत कबड्डीच्या इतिहासात प्रथमच जेतेपदाला गवसणी घातली. भारतीय रेल्वेने सन 1984साली मडगाव- गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत प.बंगालला धूळ चारत विजेतेपदाची सुरुवात केली होती. 1991साली स्पर्धा झाली नाही. आता पर्यंत त्यांनी सलग 32 वेळा विजेतेपद पटकाविले होते. ती परंपरा आज हिमाचलने मोडली. हिमाचलने आक्रमक खेळ करीत विश्रांतीलाच 17-11अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत त्यात 21गुणांची भर टाकत विजयश्री आपल्याकडे येईल याची काळजी घेतली. हिमाचलच्या या विजयाचे श्रेय ज्योती, पुष्पांदेवी यांना जाते. रेल्वेची सोनाली शिंगोटे एकाकी लढली.

रिशांकची निर्णायक चढाई
रिशांकने या चढाईत एक गडी टिपत महाराष्ट्राला अंतिम फेरीत नेऊन ठेवले. रिशांकने आपल्या 20 चढायात 13 गुण मिळविले. 3वेळा त्याची पकड झाली. गिरीश इरनाकने 4यशस्वी पकडी केल्या. ऋतुराज कोरवीने 3 यशस्वी पकडी केल्या. कर्नाटककडून प्रभानजन छान खेळला. महाराष्ट्राची अंतिम लढत गतविजेत्या सेनादला बरोबर होईल. सेनादलाने हरियाणाला 32-28असे पराभूत केले.