महाराष्ट्राचे आव्हान उपांत्य फेरीत संपले

0

कटक । ओडिसा राज्य कबड्डी संघटना आयोजित 44व्या कुमार, कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साई विरुद्ध तामीळनाडू अशी मुलांमध्ये, तर साई विरुद्ध हरियाणा अशा मुलींच्या गटात अंतिम लढती होतील. महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीतच पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्राच्या आशेवर पाणी फिरले. कटक येथील जवाहरलाल नेहरू बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात साईने महाराष्ट्राचा 56-23 असा सहज पराभव केला. साईने सुरवातच आक्रमक केली. त्यांनी झंजावाती खेळ करत विश्रांतीपर्यंत 35-12 अशी मोठी आघाडी घेतली.

पुन्हा तोच जोश कायम ठेवत महाराष्ट्राच्या गोटातील हवाच काढून घेतली. या धक्क्यातून महाराष्ट्राची मुले सावरू शकली नाहीत. त्यामुळे हा मोठा पराभव सहन करावा लागला. सतपाल कुमावत, ऋषिकेश देसाई, मनोज चव्हाण, तेजस कदम, शुभम शिंदे यांची या सामन्यात डाळ शिजली नाही. मुलांच्या दुसर्‍या चुरशीच्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशने तामीळनाडूचे आव्हान 41-37 असे मोडीत काढले. मध्यांतराला 27-19अशी आघाडी घेणार्‍या उत्तर प्रदेशला उत्तरार्धात मात्र तामीळनाडूने चांगलेच झुंजवले. परंतु, त्याचे रूपांतर त्यांना विजयात करता आले नाही याची निश्‍चितच त्यांना खंत वाटली असेल. अवघ्या 4 गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.मुलींच्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राचा कडवा प्रतिकार 33-23 असा संपविला. मध्यांतराला 15-14 अशी नाममात्र एका गुणाची आघाडी महाराष्ट्राकडे होती. त्याचा फायदा त्यांना उठविता आला नाही. त्याउलट हरियाणाने आपल्या खेळाची धार वाढवत महाराष्ट्राकडून सामना हिसकावून घेतला.