हैदराबाद । महाराष्ट्रा बरोबर भारतीय रेल्वे,पंजाब, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ यांनी महिलात 65व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गोचिबोवली-हैद्राबाद येथील जी.एम.सी. बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचे आव्हान 41-21असे सहज परतवून लावले. मध्यांतराला 25-10अशी आघाडी घेणार्या महाराष्ट्राने उत्तरार्धात सावध व संयमी खेळ करीत हा विजय साकारला. सायली जाधव, सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे, ललिता घरट यांच्या चतुरस्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. पंजाबने बिहारला 33-19असे नमवित आगेकूच केली. पूर्वार्धात चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात विश्रांती पर्यंत पंजाबकडे 16-12अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र बिहार थोडे ढासळले.
केरळने आंध्र प्रदेशाला 31-21 असे नमवले.
महाराष्ट्राच्या पुरुषांनी उपउपांत्यपूर्व फेरीत दिल्लीचा प्रतिकार 43-35 असा मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सुरुवातीपासून आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत मध्यांतरालाच महाराष्ट्राने 28-12अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र त्यांची सामन्यावरील पकड थोडी ढिली झाली. याचा फायदा घेत दिल्लीने ही आघाडी कमी-कमी करीत आणली.उत्तरार्धात महाराष्ट्राचा बचाव कमी पडला. शेवटी मध्यांतरातील आघाडीच महाराष्ट्राच्या कामी आली. महाराष्ट्राच्या रिशांक देवाडीगाने आपल्या पल्लेदार चढाईने 12 झटापटीचे गुण वसूल केले. त्याला निलेश साळुंखेने छान साथ देत 7 झटापटीचे गुण मिळविले. बचावाची बाजू गिरीश इरनाकने उत्कृष्ट सांभाळली. छत्तीसगडने कर्नाटकचा कडवा प्रतिकार 27-23असा मोडून काढला. मध्यांतराला 14-08अशी आघाडी विजेत्या संघाकडे होती. तिच त्यांच्या कामी आली.उत्तरार्धात कर्नाटकला सूर सापडला, पण तो पर्यंत उशीर झाला होता. भारतीय रेल्वेने दिल्लीला 37-19असे नमवित आपली घोडदौड सुरू ठेवली. उत्तर प्रदेशने दुबळ्या ओडीसाचा 45-12 असा सहज पाडाव केला. हरियाणाने चंदिगडचा कडवा प्रतिकार 27-24असा परतवीत पुढची फेरी गाठली. हिमाचल प्रदेश- तामिळनाडू हा सामना देखील अतिशय चुरशीने खेळला गेला. यात हिमाचलने 24-21अशी बाजी मारली.