मुंबई । राज्यात नव्या विकासपर्वाची सुरुवात करणार्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा आज सातासमुद्रापार अनोखा आणि अभिमानास्पद असा गौरव झाला. अमेरिकेतील जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी, इंडिया इनिशिटिव्ह आणि सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडिज यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज वॉशिंग्टन येथे आऊटस्टॅडिंग लिडरशिप इन डेव्हलपमेंट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जागतिक बँकेने राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक सहकार्याची तयारी दर्शवली असून फोर्ड मोबिलिटी कंपनीकडून एकीकृत वाहतूक व्यवस्थेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीसाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
अमेरिकेच्या राजधानीत आज झालेल्या पुरस्कार वितरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी सत्काराला उत्तर देताना राज्यातील परिवर्तन पर्वाची यशोगाथा विशद केली. आपण हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करत असल्याचे सांगितले. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा राज्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत होता. शाश्वत शेतीसाठी जलसंवर्धन हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे लक्षात घेऊन राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. दुष्काळ आणि टँकरमुक्त होण्यासह या गावांमधील अर्थकारण सुद्धा वेगाने बदलत आहे. लोकसहभाग हे या अभियानाचे सर्वात मोठे यश असून त्यामुळे जलयुक्त शिवार ही आता लोकचळवळ बनली आहे. नागरिकांनी केवळ श्रमदान आणि निधी संकलन केले नाही तर पाण्याचे विज्ञान समजून घेतले, हे महत्त्वाचे आहे.
निवडणुकीपूर्वी आम्ही जाहीर केलेल्या व्हीजन डॉक्युमेंटमधील बहुतांश बाबींची पूर्तता झाली आहे आणि उर्वरित बाबी अंमलबजावणीच्या टप्प्यात असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेती आणि ग्रामीण अर्थकारणाला नवीन दिशा देण्यासाठी आम्ही विविध अभियाने राबवत आहोत. भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बाजवणार असल्याने गावांना मोठ्या प्रमाणात रस्त्यांची जोडणी देतानाच डिजिटल कनेक्टिव्हीटी देखील देण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यांमधील लॉजिस्टिक आणि कृषीप्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे. राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या वॉररूमसारख्या संकल्पनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.