महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची अंतिम फेरीत धडक

0

हैद्रराबाद । येथे सुरू असलेल्या 28 व्या फेडेरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत महिला गटात महाराष्ट्राची लढत कर्नाटकशी तर पुरूष गटात अंतिम सामना कोल्हापूर बरोबर रंगेल. महिला गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने विदर्भचे आव्हान (12-1,0-4) 12-5 असे सहज परतावून लावत दिमाखात अंतिम फेरी गाठली. नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राने जिंकून प्रथम संरक्षण करण्याचा निर्णय घेतला, महाराष्ट्राच्या कविता घाणेकर ने 9 मिनिटांपैकी 4.50 मि. सुंदर संरक्षण केले तद्नंतर ऐश्‍वर्या सावंतने छान हुलकावण्या देत उर्वरित 4.10 मि. नाबाद संरक्षण केले.

आक्रमणात महाराष्ट्राने विदर्भाचे 12 खेळाडू बाद करून मध्यंतराला 11 गुणांची विजयी आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या शितल भोर ने तेजतर्रार आक्रमण करत प्रतिस्पर्धी संघाचे तब्बल 7 गडी टिपले. महिलांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकने यजमान तेलंगणाचा पराभव केला. पुरूषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने केरळ संघावर (10-5,3-6) 13-11 अशी 2 गुण व 6 मिनिटे राखून मात केली. महाराष्ट्राच्या विजयात सुरेश सावंत (2.40 मि. व 2 गडी), महेश शिंदे (2.10 मि. व 2.10 मि.) व गजानन शेंगाळ (2.20 मि व 2 गडी) यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्र पुरूष संघाचा अंतिम सामना कोल्हापूर बरोबर होईल. कोल्हापूरने अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तेलंगणाचा (9-7,9-9) 18-16 असा 2 गुणांनी पराभव केला.