महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

0

पुणे : शेतकर्‍यांपासून ठाकर लोकांमधील परंपरांच्या विविधतेचे दर्शन… वारकरी परंपरा व जागरण गोंधळ यांचे गायन आणि नृत्याद्वारे केलेले सादरीकरण… महाराष्ट्रातील विविध सणांच्या माध्यमातून सादर केलेला मराठी संस्कृतीचा कलाविष्कार… भारुड, पोवाडा यातून करण्यात आलेले लोकप्रबोधन… अशा नृत्य, नाटय, गायनाच्या माध्यमातून नंदेश उमप आणि सहकलाकारांनी लोककलेचा सुरेल नजराणा रसिकांसमोर ठेवला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मी मराठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘काळी माती निळं पाणी…’ या गीताच्या सादरीकरणातून शेतक-यांचे आणि आम्ही ठाकर ठाकर… जांभूळ पिकल्या झाडाखाली… या गीताच्या सादरीकरणातून ठाकर समाजातील संस्कृतीच्या केलेल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. तर, चंद्रभागेच्या तिरी… विठू माऊली… अशा गीतांच्या सादरीकरणातून केलेल्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये श्रोते तल्लीन झाले. दहीहंडी, होळी, बैलपोळा, मंगळागौर, गणेशोत्सव अशा विविध सणांच्या सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. तसेच शूर आम्ही सरदार… वेडात मराठे वीर दौडले सात… या गीतांमधून दाखविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला रसिकांनी भरभरून दाद दिली. प्रतापगडच्या पायथ्याशी खान… या नंदेश उमप यांनी सादर केलेल्या पोवाड्याने देखील रसिकांची मने जिंकली.