मुंबई-मोझांबिकमधून अपहरण करण्यात आलेले मुंबईतील उद्योगपती प्रमोद गोएंका यांना शेजारच्या स्वाझीलँड या देशात बंधक बनवून ठेवण्यात आल्याचा संशय आहे. मोझांबिक हा आफ्रिका खंडातील देश आहे. प्रमोद गोएंका यांच्या अपहरणामागे पाकिस्तानी गँगचा हात असून लंडनमधील एका उद्योगपतीच्या सांगण्यावरुन हे अपहरण झाल्याचा तपासयंत्रणांना संशय आहे.
मोझांबिकमधून अपहरण
प्रमोद गोएंका यांचे फेब्रुवारीमहिन्यात मोझांबिकमधून अपहरण करण्यात आले. मुंबईतील एका मोक्याच्या भूखंडाचे डील फसल्यामुळे हे अपहरण झाल्याची शक्यता आहे असे भारत आणि मोझांबिकमधील गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. लंडनमधील या उद्योगपतीला मुंबईत रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणूक करायची होती. प्रमोद गोएंका अनेक रिअॅलिटी कंपन्यांमध्ये संचालक पदावर आहेत.
प्रमोद मोझांबिकची राजधानी माप्युटोमध्ये दाखल झाल्यानंतर काही तासातच बेपत्ता झाले. १७ फेब्रुवारीला एका गुजरातील उद्योगपतीला भेटायला ते गेले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रमोद यांच्या मोबाइलवरुन त्यांच्या कौटुंबिक मित्रांना व्हॉटसअॅपवर प्रमोद यांचा नेकेड फोटो पाठवण्यात आला. त्यांचे अपहरण झाल्याचे संकेत या फोटोमधून मिळाले पण खंडणीची मागणी करण्यात आली नव्हती. प्रमोद यांच्या कौटुंबिक मित्रांमध्ये एका राजकारण्याचाही समावेश आहे. कोठारी नावाच्या व्यक्तिला भेटण्यासाठी प्रमोद मोझांबिकला गेले होते असे गोएंका कुटुंबाने सांगितले.