सातारा : जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सातारा जिल्ह्यातील फत्यापूरचे जवान दीपक जगन्नाथ घाडगे हुतात्मा झाले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामधून देण्यात आली आहे.
दीपक घाडगे जम्मू काश्मीर भागात मराठा इन्फंट्रीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. गुरूवारी पुंछ सेक्टरमध्ये एलओसीजवळ पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. भारताकडूनही याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र यामध्ये 27 वर्षीय दीपक घाडगे यांना वीरमरण आले. घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सातार्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फत्यापूर गावचे सुपुत्र दीपक जगन्नाश घाडगे यांना वीरमरण आल्यामुळे गावावर शोककळा पसरलीय. दीपक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.