महाराष्ट्रातील राजकीय पेच सुटण्याची चिन्हे

0

मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात मतभेद असले तरी मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा राजकीय पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून केंद्रातूनच सूत्र हलल्याने येत्या दोन दिवसांत या जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत राजभवनामधून राजकारण सुरू असल्याची ओरड गेले काही दिवस सुरू असली तरी प्रत्यक्षात गुरुवारी राजभवनामधूनच सूत्रे हलली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली आहे. केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत शिथिलता आणली असल्यामुळे मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुका होऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना २७ मे पूर्वी विधानपरिषदेवर निवडून जाणे आवश्यक आहे, याकडे राज्यपालांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे. राज्यपालांच्या विनंतीनुसार येत्या दोन दिवसात निवडणूक आयोग राज्यातील या ९ जागांबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. राज्यपालांनी राज्यातील विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी काल निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांची आज झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.