नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असली तरी सहा राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही तिसर्या लाटेची सुरुवात तर नाही ना? अशी भीती व्यक्त होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्रीमनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, आधी तज्ज्ञांचे असे म्हणणे होते की, ज्या राज्यांमधून करोनाच्या दुसर्या लाटेची सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे. देशातले ८० टक्के करोनाबाधित हे याच सहाराज्यांमधले आहेत. तसेच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचेही ते म्हणाले.
ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करुन करोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. कारण जसंजशी रुग्णवाढ होते, तसतसा हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण आधी जी रणनीती अवलंबलीआहे. आत्ताही आपल्याला तेच करायचे आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लसयाच रणनीतीच्या आधारावर आपल्याला पुढे जायचे आहे. तसेच ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे तसेच मायक्रो कन्टेनमेंट झोनवरअधिक लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचे एक अस्त्र म्हणून करायचा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.