महाराष्ट्रातील सर्वाधिक नफ्यातील कर्जत आगार गेले तोट्यात

0

एक कोटीपेक्षा अधिक तोटा, विद्यमान आगार प्रमुखांच्या निष्क्रिय व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका

कर्जत । कर्जत आगाराचे तत्कालीन आगार प्रमुख डी. एस. देशमुख यांनी २०१५-१६ मध्ये कर्जत आगाराला होणारा एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा तोटा भरून काढत पस्तीस लाख रुपये नफा कमविला. मात्र आत्ता विद्यमान आगार प्रमुखांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा कर्जत आगार चालू आर्थिक वर्षात तोट्यात गेले असून सुमारे पंच्चाऐंशी लाखाचा तोटा झाल्याचे समजते. कर्जत आगारातून ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी एसटी सेवा सुरू आहे तसेच अलीबाग, उरण, पेण. पनवेल, शिर्डी, नाशिक, मुरबाड, मुंबई, ठाणे, अशा लांब पल्ल्याच्या गाड्याही या कर्जत आगारातून सुरू आहेत. त्यामुळे कर्जत एसटी आगार हे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एकमेव नफ्यात असलेले आगार ठरले होते.

निर्देशित थांब्यावर बस थांबत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार
कर्जतहून मुंबई-पुण्याकडे जाण्यासाठी जरी मेल एक्स्प्रेस असल्या तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणजे एसटी सेवाच होय. कर्जत तालूक्यात सुमारेे १७५ पेक्षा अधिक गावे वाड्यापाड्या आहेत यामध्ये आदिवासी कातकरी, ठाकूर आदि गोरगरिबांचा समावेश आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने रिक्षा, मिनीडोर तसेच स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करु शकत नाही. त्यांच्यासाठी एकमेच साधन म्हणजे एसटीच होय तसेच तालुक्यातून शिक्षणासाठी कर्जतला येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे त्यातील बहुतेक विद्यार्थ्यांनी एसटीचा सवलतीचा पास काढलेला असतो. परंतु एसटी जर हात दाखवून तसेच निर्देशित केलेल्या थांब्यावर थांबत नसल्याने या विद्यार्थ्यांनाही खाजगी वाहनाने ये-जा करावी लागते. यामध्ये त्यांचा अधिक वेळ व पैसा खर्च होतो.

प्रवाशांमध्ये नाराजी
वाढते डिझेलचे दर व प्रवाशांचा खाजगी वाहनांकडे वाढता कल यामुळे तोट्यात असलेले आगार कसे फायद्यात येतील. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नेहमीच विविध क्लूप्त्या लढवत असते. याच पार्श्‍वभूमीवर मागील काळात कुठेही हात दाखवा आणि बस थांबवा असा उपक्रम सुरु केला होता. परंतु प्रवाशांनी हात दाखवून थांबविण्याची विनंती केली असता त्या न थांबताच तशाच पुढे निघून जातात. त्यामुळे येथील प्रवाशांमधून एसटीचा प्रवास म्हणजे हात दाखवून अवलक्षण असा काहीसा नाराजीचा सूर उमटत आहे.