महाराष्ट्रातील सर्व शहरे हागणदारीमुक्त!

0

मुंबई (निलेश झालटे)। गांधी जयंतीला हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट नगरविकास विभागाने साध्य केले असल्याचा दावा करण्यात येत आहे. 1 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत याबाबत घोषणा केली जाणार आहे. जवळपास सर्व शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. हगणदारी मुक्त करण्यासाठी काही शहरांची भारतीय पतनियंत्रण संस्थेकडून (क्यूसीआय) सध्या तपासणी सुरू आहे. या शहरांनाही हागणदारी मुक्तीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

शौचालय उभारणीचा कालबद्ध कार्यक्रम
राज्यातील शहरी भागात आठ लाख 32 हजार कुटुंबे उघड्यावर शौचास जातात, असा नगरविकास विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या विभागाने राज्यातील संपूर्ण 384 शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला होता. यासाठी वैयक्तिक शौचालय (आयटी) उभारण्यासाठी खास प्रोत्साहन दिले जात आहे. जागेअभावी किंवा इतर कारणांसाठी वैयक्तिक शौचालय बांधणे शक्य नसेल, तर समुदाय शौचालय (सीटी) उभारण्यावर भर दिला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन
वैयक्तिक शौचालयांकरिता रहिवाशांना प्रत्येकी 12 हजारांचे अनुदान दिले जात आहे. यात केंद्र सरकारच्या वतीने चार हजार; तर राज्य सरकारतर्फे आठ हजार रुपये दिले जात आहेत. समुदाय शौचालयांकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. सार्वजनिक शौचालये उभारण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांना चौदाव्या वित्त आयोगाने दिलेल्या आर्थिक मदतीचा फायदा होणार आहे.