नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजेपासून सुरूवात झाली आहे. १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशातील ९१ मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ७ मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरसह वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे. या सात जागांसाठी एकूण ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४ हजार ९१९ मतदान केंद्रात मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वाधिक ३० उमेदवार हे नागपूर मतदारसंघात असून सर्वात कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. नागपूरची जागा कोण जिंकणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
पहिल्या टप्प्यात मतदार संघ
नागपूरः २ हजार ६५ मतदान केंद्र. (एकूण मतदार २१ लाख ६० हजार)
वर्धाः २ हजार २६ मतदान केंद्र. (एकूण मतदार १७ लाख ४१ हजार)
रामटेकः २ हजार ३६४ मतदान केंद्र. (एकूण मतदार १९ लाख २१ हजार)
भंडार-गोंदियाः २ हजार १८० मतदान केंद्र. (एकूण मतदार १८ लाख ८ हजार)
गडचिरोली-चिमूरः १ हजार ८८१ मतदान केंद्र. (एकूण मतदार १५ लाख ८० हजार)
चंद्रपूरः २ हजार १९३ मतदान केंद्र. (एकूण मतदार १९ लाख ८ हजार)
यवतमाळ-वाशिमः २ हजार २०६ मतदान केंद्र. (एकूण मतदार १९ लाख १४ हजार)