अॅक्युपंक्चर या उपचार पद्धतीला महाराष्ट्रात अधिकाधिक विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अक्युपंक्चर सायन्स सर्वतोपरी प्रयत्नशील राहिल तसेच प्रशिक्षण, तपासणी शिबीरे, संशोधनात्मक कार्य, आधुनिक उपचापद्धतीचा अवलंब अशा स्वरुपाचे उपक्रम अधिक प्रभावीपणे नजीकच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. बी. लोहिया यांनी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या सभेत सांगितले.
महाराष्ट्र अक्युपंक्चर कौन्सिलची स्थापना करण्यात आल्यामुळे नजीकच्या काळात या अनुषंगाने शासकीय स्तरावरून तसेच अक्युपंक्चर उपचार देणा-या डॉक्टरांकडून नेमकी काय भूमिका असायला हवी, याचा विचार करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. योगेश कोडकाणी, रमाकांत देवरूखकर, संतोष पांडे, राजेंद्र गो-हे, डॉ. सचिन लोहिया, किरण फाळके, विकी छाब्रिया, राकेश गोयल आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र अॅक्युपंक्चर उपचार पद्धती विधेयक २०१५च्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आता अॅक्युपंक्चरद्वारे उपचार करणाऱ्यांना कायदेशीररित्या ओळख मिळेल, या विधेयकाच्या अनुषंगाने स्थापन होत असलेल्या कौन्सिलची व्याप्ती सर्व प्रकारच्या मुद्यांनी व्यापक करावी तसेच त्यात सर्वसमावेशकतेचा भाग असावा, पश्चिम बंगालचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही राज्यात अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीबाबत कायदा नाही. राज्यात ठिकठिकाणी अॅक्युपंक्चरद्वारे उपचार केले जातात. पण आपल्यावर कधीही कारवाई होऊ शकते, अशी भीती त्यांच्या मनात कायमची असायची. आता या कायद्यानुसार अॅक्युपंक्चर कौन्सिल स्थापन केली जाईल. ही कौन्सिल अॅक्युपंक्चरद्वारे उपचार करणाऱ्यांकरिता नियमावली तयार करील. अॅक्युपंक्चरद्वारे उपचार करणाऱ्यांना कौन्सिलकडे नोंदणी करावी लागेल. अॅक्युपंक्चरचा अभ्यासक्रम तयार केल्यावर सध्या या उपचार पद्धतीच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल. अॅक्युपंक्चरचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता दिली जाईल, यातून रुग्णांनाही रिईम्बर्समेंट मिळू शकेल , या सर्व बाबींमुळे अॅक्युपंक्चरद्वारे उपचारपद्धतीचा अवलंब निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्राला नवसंजीवनी देण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वासदेखील डॉ. पी. बी. लोहिया यांनी व्यक्त केला. संघटनेच्या सदस्यांनी यावेळी डॉ. पी. बी. लोहिया हे आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयावर लौकिक असलेले अॅक्युपंक्चर तज्ञ असल्यामुळे त्यांची महाराष्ट्र अॅक्युपंक्चर कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव संमत केला. घटनेच्या वतीने अॅक्युपंक्चर क्षेत्राच्या विकासासाठी प्रशिक्षण, तपासणी शिबीरे, संशोधनात्मक कार्य, आधुनिक उपचापद्धतीचा अवलंब अशा स्वरुपाचे उपक्रम अधिक प्रभावीपणे नजीकच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या उपचारपद्धतीचा रुग्णांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी कटीबद्ध राहण्याचाही निर्धार याप्रसंगी करण्यात आला.