महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी

0

सिंधुदुर्ग । केरळमध्ये दाखल झालेला मान्सून अद्याप महाराष्ट्रात पोहोचला नसला तरी, तळकोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. कोकणाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला असून, इथल्या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे या दोन जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. बुधवारी गोवा मुंबई महामार्गावर लांज्याजवळ रस्त्यात झाड पडल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता.

खारेपाटण ते बांदा महामार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने
कोकणात मान्सनपूर्व पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो आहे. सिंधुदुर्ग जिल्हात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, देवगड मध्ये काल रात्री जोरदार पाऊस झाला. तर आताही रत्नागिरी, राजापूर, लांजा या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काल दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून सुरूच होत्या मात्र रात्री दहाच्या सुमारास सुरु झालेल्या पावसाची अर्धा तास रिपरिप सुरुच होती. त्यामुळे खारेपाटण ते बांदा महामार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु होती.

अनेक भागातला वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत
तिकडे रत्नागिरीतही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या, रत्नागिरीसह राजापूर, चिपळून, लांजाच्या किनारपट्टीच्या भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर चांगलाच पाहायला मिळाला. अनेक भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यामुळं रत्नागिरीसह अनेक भागातला वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता.

मराठवाड्यातही कोसळला पाऊस
कोकणाप्रमाणे मराठवाड्यातही मान्सूनपूर्वचा चांगलाच जोर पाहायला मिळतो आहे. बीड शहरात काल रात्री वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या बीडकरांना थोडा दिलासा मिळाला. तर सांगली शहरात पहाटेपासून पावसाची संततधार आहे.