मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा पारा वाढतच चालला असल्याने लोकांची गर्मीमुळे कमालीची काहिली होत आहे. रविवारपासून तापमानात वाढ झाली असली तरी सोमवारी मात्र उन्हाने कहरच केला. मुंबईत सोमवारी तापमानाची 41 अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली असून त्या उष्णतेत मुंबईकर घामाने पुरता डबडबलेला दिसला.
ज्या ठिकाणचे सामान्य तापमान 40 अंश सेल्सिअस असते, तिथल्या तापमानात साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. मात्र, त्यामुळे राज्यातल्या तापमानाला हिट वेव्ह म्हणता येणार नाही, असे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. आताची परिस्थिती सामान्य आहे. विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात एखाद-दोन ठिकाणी हिट वेव्ह सारखी परिस्थिती आहे. मात्र, तिथेही उद्यानंतर परिस्थिती निवळेल, असेही पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. ठाणे आणि अकोल्याचे तापमान 41 अंश सेल्सिअस असून पुण्याचे 3.8.3 तर रायगडचे 43 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, केरळ, तामिळनाडू, ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची चिन्हे आहेत. मात्र, महाराष्ट्रात आवश्यक तेवढी आर्द्रता नाही, त्यामुळे ढग तयार झाले तरी पावसाची शक्यता नाही. राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे तापमान 40 अंशांच्या वर पोहोचले आहे. तर उरलेल्या शहरांचे तापमानही 35 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. अकोल्यात सर्वाधिक 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली आणि सोलापूरमध्येही पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.