मुंबई – महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. पण, त्यातून मध्यावधी निवडणुका लादल्या गेल्याच तर त्या लढाव्या आणि जिंकाव्याच लागतील व त्या आम्ही जिंकणारच, असा विश्वास भाजपाचे अध्यक्ष अमित साह यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकसभा निवडणूकानंतर देशात ज्या काही निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाने प्रगतीच केली आहे. प्रत्येक निवडणुकीत मोठा विजयही मिळविला आहे. प्रत्येक राज्यात भाजपाची ताकद वाढली असून पक्ष संघटनेतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत देशातील १३ राज्यांमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारप्रमाणे राज्यातील देवेंद्र सरकारही चांगले काम करत असून हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देवेंद्र सरकारने योग्यरितीने हाताळला असून त्यात त्यांना यश आले आहे. राज्य सरकारचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू आहे. राज्यासह संपूर्ण देशात भाजपाची ताकद वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला असून ही ताकद वाढविण्यासाठीच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील महाराष्ट्राचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत दिली आहे. त्यानुसार यापूर्वी महाराष्ट्राला केंद्राच्या करातून ७४ हजार कोटी रूपये मिळत होते. त्यात केंद्राने वाढ केली असून हा आकडा २ लाख १९.५० कोटी रूपयांपर्यत वाढविला आहे. याव्यतिरिक्त राज्यातील मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी २० हजार कोटी रूपयांची मदत, कोस्टल रोड, पीएमजीपी योजनेसाठी ११ हजार कोटी रूपयेही राज्याला देण्यात आले असून याशिवाय १ लाख कोटी रूपयांची विकासकामे महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या सहाय्याने सुरू आहेत, सेही शाह म्हणाले.
मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून देशातील आदिवासी, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या असून त्यांची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी सुरू आहे. संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा जीएसटी कायदा आम्ही लागू केला. त्यामुळे देशात एक देश एक करप्रणाली लागू होणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार केंद्रात १० वर्षे होते. मात्र या १० वर्षांच्या कार्यकालात त्या सरकारमधील प्रत्येक मंत्री हा स्वतःला पंतप्रधान समजत होता. त्या काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला. सध्याचे भाजपाचे सरकार पारदर्शी असून विरोधकांना आतापर्यंतच्या तीन वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप करता आला नाही, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षांत देशातील जवळपास ६० कोटी लोकांचे बँकेत खाते नव्हते. त्या सर्वांना बँकेत खाते उघडायला लावून जनधन योजनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेशी आम्ही जोडले. देशातील १२.५० कोटी नागरीकांकडे गँस कनेक्शन नव्हते. परंतु गेल्या तीन वर्षात २.५ कोटी जनतेला गँस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. मुद्रा बँकेच्या माध्यमातून ७ लाख ६४ कोटी तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ८ कोटींपैकी ४ कोटी नागरिकांना शौचालये बांधून देण्यात आली आहेत. देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहूती देणाऱ्या जवानांना वन रँक वन पेन्शन लागू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भाच्या प्रश्नावर भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर शिवसेनेचा विरोध असला तरी त्यांना या प्रश्नावर राजी करून घेऊ असा विश्वास व्यक्त करत स्वतंत्र विदर्भ राज्य भाजपा निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने सुचविलेल्या उमेदवाराचा विचार करणार असल्याचेही शाह यांनी नमूद केले.
काश्मीर प्रश्न आता घडणाऱ्या घटनांवरून लगेच समजणारा नाही. त्यासाठी १९९८ सालापासून सर्व घटनांकडे पाहवे लागणार आहे. या घटनांचा अभ्यास केल्यास काश्मीर प्रश्न समजून घेण्यास मदत होईल. गेल्या काही दिवसांपासून लष्करी जवांनावर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून योग्य ती काळजी घेण्यात येईल. तसे प्रयत्नही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवू असे सांगत शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांना टोला लगावला. शाह गुजरात विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री रूपानी यांनी नुकतेच केले होते.