मुंबई : ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात करणार म्हणजे करणार, जे आव्हान देतील त्यांच्या छाताडावर बसून त्यांचे आव्हान तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही’, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. ते शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांवरही टीकास्त्र सोडले.
शरद पवारांवर टीकास्त्र
देशात मुघलांचा हिरवा वरवंटा येत होता तेव्हा हिंदुत्वाच्या भगव्याखाली एकत्र आणून तो वरवंटा तोडून मोडून टाकला. पण तुम्ही मात्र मराठी माणसांमध्ये फूट पाडत आहात. पगडीमध्येसुद्धा तुम्ही राजकारण करत आहात. याद राखा, तुम्ही मराठी माणसांमध्ये फूट पाडलीत तर मराठी जनता तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना दिला. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज हे आपली दैवते आहेत. दैवतांच्या पगड्यांवरून राजकारण करणे गैर आहे, असा टोलाही उद्धव यांनी पवार यांना लगावला.