महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन घसरले : शरद पवार

0

पुणे : निसर्गाचा लहरीपणा आणि पाण्याची कमतरता यामुळे महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन घसरले असल्याचे वक्तव्य माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. दुष्काळामुळे उसाच्या उत्पन्नात घट झाली आहे. आता कृषी खाते कसे काम करणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकेकाळी तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांच्या बरोबरीने ऊस उत्पादन करणार्‍या महाराष्ट्रात यंदा फक्त 40लक्ष टन उत्पादन झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि विविध मान्यवर हजर होते.

यापूर्वी 1223 कोटी असलेली साखर कारखान्यांची तोट्याची रक्कम वाढून 2442 कोटींवर पोचल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कारखाने वगळता राज्यात 70 कारखाने अडचणीत असल्याचे ते म्हणाले. यंदा संपूर्ण हंगामात 38कारखाने सुरु होऊ शकले नाहीत. 32 कारखाने डिसेंबर 2016ला बंद पडले. सध्या महाराष्ट्रात हुतात्मा कारखाना सोडल्यास सर्व कारखाने बंद पडल्याचे वास्तवही त्यांनी मांडले. सरकारच्या सांगण्यावरून कारखान्यांनी इथेनॉल तयार केले. मात्र पेट्रोल कंपन्यांनी वेगळा पवित्रा घेतला आहे. सरकारने दिलेली किंमत पेट्रोल कंपन्या मान्य करत नसल्याचे ते म्हणाले. वीजनिर्मिती प्रकल्पात अनेक कारखान्यांनी गुंतवणूक केली असून तेही अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार कमी दरात वीज घेत असल्याने घोडगंगासारखे अनेक कारखाने पुढच्या वर्षी उभे राहू शकत नसल्याचा दाखला त्यांनी दिला.

विघ्नहर कारखान्याला पुरस्कार
यावेळी झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून देण्यात येणारा वसंतदादा पाटील पुरस्कार विघ्नहर सहकारी साखर कारखाना, निवृत्तीनगर या कारखान्याला देण्यात आला.सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन याकरिता देण्यात येणारा डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील पुरस्कार दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, पिसोळ तर आर्थिक व्यवस्थापन विभागातल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील या पुरस्काराने शरद सहकारी साखर कारखाना, हातकणंगले यांना गौरवण्यात आले. मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि रोख रक्कम रुपये एक लाख, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

आमचा प्रश्न आम्ही सोडवू : पतंगराव कदम
नेतृत्वावरून सुरु असलेली काँग्रेसमधील राणे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची धुसफूस हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. पुढे होणार्‍या बैठकीत चर्चा करून हा प्रश्न सोडवणार असल्याचे काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी सांगितले. पुण्यातील निवडणुका हा माझ्या स्तरावरील प्रश्न नसल्याने त्यात उतरलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.