महाराष्ट्राला देशातच नव्हे तर १९३ देशांत पुढे नेणार!

0
 विरोधकांनो निवडणुका नाही पण मने नक्की जिंकाल!; वित्त मंत्र्यांचा विरोधकांवर टोला
 
मुंबई:- महाराष्ट्र राज्य विकासाची नवी क्षेत्रे पादाक्रांत करत असून आपला विकास दर वाढला आहे. विरोधकांनी एकत्रित येऊन हातभार लावला तर महाराष्ट्र 193 देशात पुढे नेऊ असे सांगत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांनो, सोबत राहा तुम्हाला निवडणूक जिंकता येणार नाही पण टीकात्मक काम न करता रचनात्मक काम केले तर मने मात्र नक्की जिंकाल असा टोमणा मारला.
वित्तमंत्र्यांनी गुरुवारी विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपला विकास दर वाढला असून तो 7.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोबतच मागील वर्षापेक्षा सकल उत्पन्न वाढले असून 24, 97 हजार कोटी झाले आहे. आपण दरडोई उत्पन्नात कर्नाटकला मागे टाकले असून 1 लाख 80 हजार दरडोई उत्पन्न झाले आहे. आपला ऋणभार 21.2 टक्के होता तो आता 16.6 टक्केवर पोहोचला असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्याला देशातच नव्हे तर जगातील १९३ देशात पुढे नेऊ असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
यावेळी मुनगंटीवार बोलत असताना जयंत पाटील यांनी, ‘सुधीरभाऊ, राज्याचे जाऊ द्या चंद्रपूरचे बोला’ असा टोला लागलेला यावर मुनगंटीवार यांनी, ‘पहले बी फॉर बारामती पी फॉर पुणे होते, आता बी फॉर बल्लारपूर, पी फॉर पोंभुर्णा झाले आहे.’ असे म्हणत टोला परतावून लावला.