मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. भाजप १०, शिवसेना 2 तर रिपाईच्या एका आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र यावरून, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होत असेल तर यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असेल? असे निलेश राणे म्हणाले.
२०१७ मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान , ‘सव्वाशे-दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करायला मला फारसे काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झाला आहे, पण तसे काही नाही. हा गैरसमज काढून टाका. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी बनणार नाही,’ असे सावंत म्हणाले होते. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊन्ट वरून सावंत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे.