स्वरराज ढोल ताशा स्पर्धा : शिवसाम्राज्य पथकाला विजेतेपद
पुणे : महाराष्ट्रात ढोल-ताशा ही तशी जुनी परंपरा आहे. त्याला महत्वप्राप्त करून देण्यात अनेकांचा मोठा वाटा आहे. आज वादक ज्या त्वेषाने ढोल वाजवतात त्याच त्वेषाने महाराष्ट्रावर जो कुणी संकट आणेल त्याला देखील तितक्याच ताकदीने आपण बडवाल हीच मला आशा आणि अपेक्षा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष्य राज ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे, मंदार बलकवडे व निलेश हांडे यांच्या वतीने तिसऱ्या ‘स्वरराज ढोल-ताशा करंडक’ स्पर्धेचे आयोजन शनिवारवाडा प्रांगणात करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, अमित राज ठाकरे, सौरभ गाडगीळ, बाळा शेडगे, किशोर शिंदे, अजय शिंदे, नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, वसंत मोरे, साईनाथ बाबर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हे देखील वाचा
या स्पर्धेचे विजेतेपद शिवसाम्राज्य पथकाने, दुसरे स्थान समाधान पथकाने तर तिसरे स्थान रुद्रतेज पथकाने पटकावले. विजेत्या शिवसाम्राज्य पथकाला १ लाख रुपये व सन्मानचिन्ह, समाधान पथकाला ७५ हजार रुपये व सन्मानचिन्ह तर रुद्रतेज पथकाला ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. समाधान पथकाच्या आयुष गाडेला सर्वोत्तम ढोलवादक, शिवसाम्राज्य पथकाच्या ओंकार वीरला सर्वोत्तम ताशावादक तर आदिमाया पथकाच्या ओंकार महामुनीला सर्वोत्तम ध्वजधारक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आपल्या क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या यावेळी शिक्षक तज्ज्ञ न. म. जोशी, शांताराम जाधव, प्रकाश कोकाटे, सौरभ गाडगीळ, चारुहास पंडित, शिवछत्रपतीपुरस्कार विजेती ऋतुजा सातपुते, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, उद्योजक अभिजित शेठ व आमोद देव यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किशोर शिंदे यांनी केले.