संविधान जागृती: विविध कार्यक्रमाचे आयोजन
तळोदा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संविधान दिनानिमित्त संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन करण्यात असून राज्यासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या कालावधीत संविधान बांधलकी महोत्सव साजरा करण्यात येतो. त्यामध्ये संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन, संविधानाचे महत्व, त्यातील मूल्ये संविधानासाठी बाबासाहेबांचे योगदान आदी विषयांवर व्याख्यान, व्याख्यानमाला चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादीच्या माध्यमातून प्रबोधन, चालता-बोलता संविधान प्रश्नमंजुषा, पोस्टर प्रदर्शन, गाणी व पोवाडा सादरीकरण, शिक्षक विद्यार्थी युवा व महिला यांचे प्रबोधन शिबीर, कार्यकर्ता कार्यशाळा, संविधानासंबधी प्रदर्शन, लघुपट सादरीकरण, समविचारी सहविचार,संविधान संकल्प,इत्यादी कार्यक्रम घेण्यात येतात.
दरम्यान, बांधिलकी महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील अनिसच्या शाखांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नंदुरबार शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नंदुरबार मधील विविध शाळाशाळांमध्ये जाऊन कार्यकर्ते संविधानाच्या पोवाडा व संविधानाविषयी भारुडांचे सादरीकरण करणार आहेत. शहादा शाखेच्या वतीने समविचारी संस्था-संघटनाच्या सहभागाने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान बांधिलकी महोत्सवाअंतर्गत कार्यक्रम घेण्यासाठी अंनिसच्या स्थानिक शाखांशी संपर्क करावा,असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तळोदा शाखेच्या वतीने संविधान जागृती यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये तळोदा तालुक्यातील गावागावात जाऊन महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते महाराष्ट्र आणि संविधान विषयी भूमिका नागरिकांचे भारतीय राज्यघटनेचे धर्मनिरपेक्षता मूल्य, सर्वधर्मसमभाव आदींसह मूलभूत हक्क व अधिकार तसेच कर्तव्य आदींविषयी जनजागृती करणार आहेत. सोबतच आदर्श नागरिकांसाठी संविधानाप्रती निष्ठा लोकशाही मूल्यांची जपणूक व रुजवणूक आदींविषयी ते माहिती देणार आहेत.यासंबंधी संविधान यात्रेचे नियोजन पूर्ण झाले असून तालुक्यातील धानोरा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकपासून यात्रेचे उदघाटन होणार असल्याची माहिती तळोदा अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष मुकेश कापुरे यांनी दिली आहे.